निफाड @ 6.6, नीचांकी तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 02:48 PM2018-12-19T14:48:39+5:302018-12-19T14:48:56+5:30
निफाड : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तापमान तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर बुधवारी (दि. १९) ६.६ अंश इतके नोंदविले गेले.
निफाड : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तापमान तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर बुधवारी (दि. १९) ६.६ अंश इतके नोंदविले गेले. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून, निफाडवासीयांना हुडहुडी भरली आहे. यावर्षीचे हे सर्वात नीचांकी तापमान होय. सोमवारी दि. १७ रोजी कुंदेवाडी हवामान केंद्रात ७.२ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यानंतर थंडीचे प्रमाण वाढत जाऊन बुधवारी दि १९ रोजी ६.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठून गेले . कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. ही थंडी गहू ,कांदे पिकांना फायदेशीर ठरणार आहे, मात्र द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे ज्या शरद सीडलेस ,परपल, जम्बो या काळ्या जातीच्या द्राक्ष बागेतील मण्यात फुगवण होऊन पाणी उतरले आहे, अशा घडातील मणी तडकण्याचा धोका वाढला आहे. कारण या जातीच्या द्राक्ष मण्यांचे आवरण पातळ असत. जर ही थंडी वाढत गेली तर द्राक्ष मणी तडकण्याचे प्रमाण वाढून द्राक्षाचे उत्पादन कमी होण्याचा धोका वाढला आहे. ज्या द्राक्ष बागा फुगवणीच्या अवस्थेत आहेत. अशा बागांच्या द्राक्ष मण्यांची फुगवण थांबणार आहे तर उशिराच्या द्राक्ष बागेतील फुलोऱ्यातील मण्यांची फुगवण एकसारखी होणार नाही. थंडीचे प्रमाण वाढल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असून औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे . थंडीमुळे द्राक्षाच्या झाडांना ऊब देण्यासाठी शेतकरयांनी बागेत शेकोट्या पेटवल्या होत्या. थंडीमुळे द्राक्ष वेलींना अन्न पुरवठा करणाºया पेशींचे कार्य थांबण्याची शक्यता वाढल्याने शेतकºयांनी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले. थंडीचा कडाका इतका जास्त होता की दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता.