नाइट कर्फ्यू : पहाटेपर्यंत पोलीस गस्त अन् सक्तीची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:17 PM2020-12-23T21:17:24+5:302020-12-23T21:20:48+5:30
रात्री११ वाजेपासून पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ह्यअह्ण पॉइंटवरील ठिकाणांवर बॅरिकेडचा वापर करुन नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पहाटेपर्यंत चोख पेट्रोलिंग आपआपल्या हद्दीत करत 'नाइट कर्फ्यू'चे उल्लंघन करताना कोणीही आढळून आल्यास संबंधितावर तत्काळ आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम-१८८नुसार कारवाचे आदेश देण्यात आले आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव अन आगामी ख्रिसमसचा सण व थर्टी फर्स्टच्या निमित्ताने सार्वजनिकरित्या शहर व परिसरात कोठेही नागरिकांची एकत्रित गर्दी जमून आणि कोरोनाचा प्रसार होण्यास निमंत्रण मिळण्याची शक्यता लक्षात घेता शासनाच्या आदेशानुसार पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी आदेश (कलम-१४४/१/३) लागू केल्याचे जाहीर केले. यानुसार बुधवारी (दि.२३) रात्रीपासून शहरात पोलिसांकडून अंमलबजावणी केली जात आहे. सक्तीची नाकाबंदी आणि पहाटे सहा वाजेपर्यंत चोख पोलीस गस्त सुरु करण्याचे आदेश पाण्डेय यांनी दिले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाण्डेय यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३च्या कलम-१४४ (१) व (३) अन्वये रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी (मनाई आदेश) लागू केली आहे. बुधवारपासून येत्या ५ जानेवारीपर्यंत आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या आदेशाचे पालन करणे नागरिकांवर बंधनकारक राहणार आहे. याप्रकरणी पोलिसांना अंमलबजावणीचे आदेश देण्यात आल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर प्रत्येकाने मास्क लावणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित दोन फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. पान, गुटखा, तंबाखूसेवन व मद्यप्राशन, धुम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिकरित्या पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमण्यावरदेखील निर्बंध घालण्यात आले आहे. प्रवास करताना तसेच कामाच्याठिकाणीसुध्दा मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे थुंकण्यावरसुध्दा बंदी घालण्यात आली आहे. रात्री ११ वाजेनंतर चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर घोळक्याने फिरताना किंवा गप्पा मारताना कोणीही आढळून आल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
संचारबंदीची अंमलबजावणीचे सक्तीचे आदेश
रात्री११ वाजेपासून पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ह्यअह्ण पॉइंटवरील ठिकाणांवर बॅरिकेडचा वापर करुन नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पहाटेपर्यंत चोख पेट्रोलिंग आपआपल्या हद्दीत करत 'नाइट कर्फ्यू'चे उल्लंघन करताना कोणीही आढळून आल्यास संबंधितावर तत्काळ आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम-१८८नुसार कारवाइचे आदेश देण्यात आले आहे.