ओझर विमानतळावर नाइट लँडिंगला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:16 AM2020-12-06T04:16:08+5:302020-12-06T04:16:08+5:30
ओझर : येथील विमानतळावर नाइट लँडिंग करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानतळांशी कनेक्ट होण्याबरोबरच नाशिकहून आता आंतरराष्ट्रीय ...
ओझर : येथील विमानतळावर नाइट लँडिंग करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानतळांशी कनेक्ट होण्याबरोबरच नाशिकहून आता आंतरराष्ट्रीय उड्डाणेही शक्य होणार आहेत. या सुविधेमुळे ओझर विमानतळावरून पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. तसेच मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीचा भार लक्षात घेता त्याला नाशिक हा व्यवहार्य पर्याय ठरणार आहे.
ओझर विमानतळावर नाइट लँडिंग तसेच इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, प्रवासी विमान वाहतुकीसाठी नाइट लँडिंग किंवा टेक ऑफसाठी डीजीसीएचे प्रमाणपत्र बंधनकारक असते. ओझर विमानतळ एचएएलच्या अखत्यारित असल्याने एचएएलकडे हे प्रमाणपत्र नाही. एचएएलने त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि सोयी-सुविधा उपलब्ध केल्या होत्या. त्यानुसार डीजीसीएच्या अधिकार्यांनी फेब्रुवारी महिन्यात ओझर विमानतळाची पाहणी केली. अखेर सर्व चाचण्यांनंतर डीजीसीएने ओझर नाइट लँडिंगला परवानगी दिली. यामुळे नाशिक देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहरांशी जोडले जाणार आहे.
इन्फो
मुंबईला सक्षम पर्याय?
उडान योजनेमुळे मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक वाढल्याने अनेकदा टाइम स्लॉट देताना विलंब होतो. सद्य:स्थितीत मुंबई विमानतळावरून दररोज तब्बल ९००हून अधिक विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग होते. हा सारा व्याप आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाचे काम या दोन्ही बाबी लक्षात घेऊन मुंबईला पर्यायी विमानतळ कोणते, यासाठी गांभीर्याने विचार सुरू आहे. ओझर विमानतळावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास मुंबईला सक्षम पर्याय म्हणून हे विमानतळ उत्तम पर्याय ठरू शकते. त्यामुळे हवाई वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.
इन्फो :
कंपन्यांना आर्थिक लाभ शक्य
मुंबईनंतर १५० किलोमीटरच्या परिघात अन्य विमानतळ नाही. सध्या अहमदाबाद विमानतळ मुंबईला पर्याय म्हणून वापरले जाते. मुंबई-अहमदाबादचे हवाई अंतर २४० मैल आहे. त्या तुलनेत मुंबईपासून नाशिकचे हवाई अंतर केवळ ९७.८ मैल आहे. त्यामुळे मुंबई-ओझर प्रवासासाठी ०.३० मिनिटे आणि ७५० लिटर इंधन लागते. याच तुलनेत अहमदाबादला ०.४६ मिनिटांचा वेळ आणि २००० लिटर इंधन लागते. त्यामुळे ओझरचा पर्याय फायदेशीर ठरेल. ओझरला येताना आणि जाताना प्रवाशी वाहतुकीतूनही विमान कंपन्यांना आर्थिक लाभही होऊ शकेल.