रात्र काढली खड्ड्यात: अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे वाचले वयोवृध्दाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:34 PM2018-07-09T14:34:03+5:302018-07-09T14:46:15+5:30
अझहर शेख / नाशिक : महापालिका अग्निशामक दलाच्या मुख्यालयाचा दुरध्वनी खणखणला..., ‘हॅलो, सिव्हिल हॉस्पिटलमागे एक म्हातारे बाबा खड्डयात पडले आहे, मदत पोहचवा’ तत्काळ अलार्म वाजविला जातो आणि जवान सज्ज होऊन बंब घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने रवाना होतात. सायरन वाजवित बंबाचा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात प्रवेश होतो आणि थेट बंब इमारतीच्या मागील बाजूने जातो यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो, नेमके काय घडले? याची कुतूहल अन् भीती निर्माण होते. काही मिनिटांतच जवानांकडून ‘रेस्क्यू आॅपरेशन’ हाती घेतले जाते. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत एका पंधरा ते वीस फूट खोल खड्डयात पडलेल्या वयोवृध्दाला बाहेर काढण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.
याबाबत मुख्यालयातील सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी सकाळी सव्वा दहा वाजता दुरध्वनीवरुन माहिती मिळताच सब स्टेशन आॅफिसर दिपक गायकवाड यांनी पथकाला सज्ज करीत अत्याधुनिक साहित्यांनी सुसज्ज असलेला ‘हॅजेमट व्हॅन’ बंबाद्वारे मदत पोहचविण्याचा निर्णय घेतला गेला. बंबचालक गंगाधर निंबेकर यांनी बंब घटनास्थळी पोहचविण्याची धुरा सांभाळली. लिडिंग फायरमन इकबाल शेख, फायरमन इसहाक शेख, राजू नाकील, शिवाजी खुळगे, घनश्याम इंफाळ, दिनेश लासुरे, नाना गांगुर्डे आदिंना घेऊन बंब घटनास्थळी अवघ्या दोन ते तीन मिनिटांत पोहचला.
जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असून त्यासाठी खोदण्यात आलेल्या सुमारे २५ फूटाच्या खडडयात झोपलेल्या अवस्थेत वयोवृध्द नागरिक आढळून आले. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांचा ठोका चुकला. जवानांनी ‘फोल्डिंग लॅडर’ खड्ड्यात सोडले आणि फायरमन इस्हाक शेख यांनी त्या शिडीवरुन खड्डयात उतरुन अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला तपासले असता हृदयाचे ठोके सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी हाताच्या इशाऱ्याने ‘कॅ ज्युएल्टी’ जीवंत असल्याचा संदेश अन्य मदतकार्य करणा-या खड्याच्या वरील बाजूस असलेल्या सहका-यांना दिला अन् सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तत्काळ त्यांनी त्या जेष्ठाला जागे केले आणि शिडीच्या सहाय्याने धरुन सुरक्षितरित्या बाहेर काढले. खड्डयात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला किरकोळ मार लागलेला होता व रात्रभर खड्डयात पडून राहिल्याने अत्यवस्थ झाले होते. तत्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजय आहेर (६५) अशी त्यांची ओळख पटली आहे. शहरात दमदार पाऊस नसल्यामुळे खडडयात पाणी साचलेले नव्हते त्यामुळे पुढील अनर्थ टळला.