रात्रीतून गाव झाले ‘स्वच्छ’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 06:03 PM2018-08-23T18:03:48+5:302018-08-23T18:04:48+5:30
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्याचे गुणांकन ठरविण्यासाठी स्वतंत्र संस्थेमार्फत सर्वेक्षण करून क्रमवारी निश्चित करण्याकरिता येणारी केंद्रीय समिती देवळा तालुक्यातील सटवाईवाडी गावाला भेट देणार असल्याचे निश्चित झाल्यावर या गावात संपूर्ण तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा मंगळवार (दि.२१) पासून राबत असल्याने रात्रीतून गाव चकचकीत झाले आहे.
देवळा : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्याचे गुणांकन ठरविण्यासाठी स्वतंत्र संस्थेमार्फत सर्वेक्षण करून क्रमवारी निश्चित करण्याकरिता येणारी केंद्रीय समिती देवळा तालुक्यातील सटवाईवाडी गावाला भेट देणार असल्याचे निश्चित झाल्यावर या गावात संपूर्ण तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा मंगळवार (दि.२१) पासून राबत असल्याने रात्रीतून गाव चकचकीत झाले आहे. मात्र दोन दिवसांच्या ग्रामस्वच्छतेसाठी झालेला खर्चाचा ताळमेळ पंचायत समिती प्रशासन कसा घालणार याबाबत उत्सुकता आहे.
देवळा तालुक्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे गुणांकन ठरविण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतीने आपापल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता मोहीम चालू केली होती. मात्र तपासणी होणाऱ्या गावांची गोपनीय माहिती सोशल मीडियावर प्रकाशित झाल्याने तपासणीच्या एक दिवस अगोदर समितीने अचानकपणे संभाव्य गावाऐवजी सटवाईवाडी गावाची तपासणी करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे संपूर्ण देवळ्या तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा मंगळवारपासून सटवाईवाडी गावात तळ ठोकून होती. त्यामुळे एकाच रात्रीत गावाची दशा बदलल्याने गावकºयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.