सणासुदीनिमित्त शहरात होणार रात्रीची सफाई
By admin | Published: October 1, 2016 01:27 AM2016-10-01T01:27:27+5:302016-10-01T01:27:55+5:30
महापालिका : महापौरांकडून स्वच्छतेचा आढावा
नाशिक : उद्या शनिवार (दि. १) पासून सुरू होणारा नवरात्रोत्सव आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला दसरा-दिवाळीचा सण या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देतानाच जादा कर्मचारी लावून रात्रीची सफाई करण्याची सूचना महापौर मुर्तडक यांनी आरोग्य विभागाला दिली.
सणासुदीनिमित्त शहरात स्वच्छता राहावी यासाठी महापौरांनी आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकांसह सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा उपस्थित होते. यावेळी महापौरांनी सांगितले, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता घरोघरी साफसफाई होणार आहे. त्यामुळे बराचसा कचरा रस्त्यावर अथवा नदीकाठी येऊन पडणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करावे. नवरात्रोत्सव आणि दसरा-दिवाळी सणाच्या वेळी शहरात कुठेही कचरा साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. मुकादम यांनी सफाई कामगारांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. ज्या भागात नवरात्रीचा उत्सव, जत्रा असेल तेथे जादा कर्मचारी लावून रात्रीच्या वेळी सफाई करावी. स्वच्छता निरीक्षकांचा बंद झालेला ओव्हर टाइमचा मोबदला देण्याबाबत आयुक्तांशी चर्चा केली जाणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. झाडपाल्यासाठी स्वतंत्र गाडी उपलब्ध करून देण्याची सूचना आरोग्याधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)