नाईक संस्थेची मतदार यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:48 AM2019-06-30T00:48:20+5:302019-06-30T00:48:38+5:30
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमाकांची मोठी शिक्षण संस्था असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८ हजार ६९४ मतदारांची अंतिम यादी शनिवारी (दि.२९) जाहीर करण्यात आली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमाकांची मोठी शिक्षण संस्था असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८ हजार ६९४ मतदारांची अंतिम यादी शनिवारी (दि.२९) जाहीर करण्यात आली आहे. प्राथमिक मतदार यादीवर तीन दिवसांत आलेल्या १०९ हरकतींवर निवडणूक मंडळाने निर्णय देऊन पत्ता व नावात बदल केले असून, मयत सभासदांच्या प्राप्त मृत्यू दाखल्यांची पडताळणी करून ८० सभासदांची नावे कमी करण्यात आली असून, प्राथमिक यादीत आणखी मतदारांची नावे वाढली असल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. गजेंद्र सानप यांनी दिली.
नाईक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदासह चार पदाधिकारी, ६ विश्वस्त व १९ तालुका संचालक अशा एकूण २९ जागांसाठी येत्या २० जुलै रोजी संस्थेचे आठ हजार ७७२ मतदारांची प्रारुप यादी सोमवार, दि. २४ जून रोजी जाहीर करण्यात आली होती. या यादीवर गुरुवारपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर शुक्रवारी निवडणूक मंडळाने सर्व प्राप्त १०९ सभासदांच्या मतदार यादीतील नावात तसेच पत्त्यात बदल करण्याच्या अर्जांवर निर्णय घेऊन हे बदल केले आहेत. त्याचप्रमाणे ८० सभासदांचे मृत्यू दाखलेही निवडणूक मंडळाला प्राप्त झाले होते. या मयत सभासदांची नावेही या यादीतून वगळण्यात आली आहेत. तर सभासद नोंदवहीत नावे असतानाही मतदार यादीत चुकून वगळल्या गेलेल्या नावांचा तसेच १९९९ मध्ये मतदार यादीत होते, परंतु २०१४ च्या यादीत वगळले होते त्या नावांचा पुन्हा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारे मतदार यादीविषयी प्राप्त अधिकृत माहितीच्या आधारे निवडणूक मंडळाने एकूण ८६९४ मतदारांची यादी जाहीर केली असून, हे सर्व मतदार नाईक शिक्षण संस्थेचे येणाºया पाच वर्षांसाठी कारभारी निवडणार आहेत.