निमा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर
By admin | Published: July 21, 2016 01:48 AM2016-07-21T01:48:14+5:302016-07-21T02:07:17+5:30
निमा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर
सातपूर : निमा निवडणुकीतील कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवार निश्चितीवरून सत्ताधारी एकता पॅनलच्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून एकता पॅनलला आव्हान देण्याचा निर्णय काही उमेदवारांनी घेतला असल्याने निमाच्या बिनविरोध निवडीला खीळ बसली आहे. त्यामुळे निवडणूक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आयमाप्रमाणेच निमा निवडणुकीत वादविवाद होऊ नयेत आणि निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून अगोदरच कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीला उमेदवार ठरविण्याचे आणि बिनविरोध निवडणूक करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले होते. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे दिसत होती. या कमिटीने त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले होते. परंतु काल झालेल्या बैठकीवरून त्यांच्या प्रयत्नाना यश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. उमेदवार निश्चितीवरून मतभेद झाल्याने कोअर कमिटीने अखेर निर्णय उमेदवारांवरच सोपविला आहे.
दरम्यान सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसत असतांना अन्य काही उमेदवारांनी एकता पॅनलला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ पडल्यास एकताच्या विरोधात पॅनल तयार करण्याची तयारी करण्यात येत आहे. उमेदवारी माघारीसाठी २२ जुलै शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी उमेदवारांची मनधरणी करण्यास कोअर कमिटीला यश आलेले नाही. काही उमेदवार माघार घेण्यास तयार नसल्याने कोअर कमिटी हतबल झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही उमेदवार आव्हान देण्याचा प्रयत्न करीत असल्याने निवडणूक अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे. (वार्ताहर)