निमा निवडणुकीत तीनही पॅनल्सकडून फलकबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:38 AM2018-07-28T00:38:47+5:302018-07-28T00:39:16+5:30
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत तीन पॅनल एकमेकांविरोधात निवडणूक लढवित आहेत. सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या हायटेक प्रचाराबरोबर प्रथमच सातपूर, अंबड आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीत ठिकठिकाणी फलक उभारून फलकबाजी करण्यात आली आहे.
सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत तीन पॅनल एकमेकांविरोधात निवडणूक लढवित आहेत. सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या हायटेक प्रचाराबरोबर प्रथमच सातपूर, अंबड आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीत ठिकठिकाणी फलक उभारून फलकबाजी करण्यात आली आहे. निमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.२९) निमा कार्यालयात मतदान होेणार आहे. निमाच्या इतिहासात प्रथमच माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांचे एकता पॅनल, तर किशोर राठी-आशिष नहार यांचेही एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनल असे तीन पॅनल एकमेकांविरोधात निवडणूक लढवित आहेत. तीनही पॅनलच्या उमेदवारांकडून सिन्नर, सातपूर, अंबड येथील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे आणि आपल्याच पॅनलला मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला जात आहे. तर सर्वच पॅनलकडून केलेल्या कामांची माहिती आणि भविष्यात करावयाच्या कामांची माहिती असलेला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या निमाच्या निवडणुकीत कधीही फलकबाजी करण्यात आलेली नव्हती. २६ जागांसाठी तीनही पॅनल्सकडून ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक पॅनलकडील उमेदवारांची संख्या लक्षात घेता उमेदवारांच्या परिचयासाठी सोशल मीडियाबरोबरच फलकबाजी करण्यात आली आहे. सर्वसाधारण मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून येत नाही.