निमाकडून पूरग्रस्तांसाठी पंधरा लाखांचा मदतनिधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:36 AM2019-08-14T01:36:47+5:302019-08-14T01:37:57+5:30
सात पूर : जिल्ह्यातील सायखेडा, चांदोरी तसेच सांगली, कोल्हा पूर व अन्य जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे नैसर्गिक आपत्ती कोसळली असल्याने ...
सातपूर : जिल्ह्यातील सायखेडा, चांदोरी तसेच सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे नैसर्गिक आपत्ती कोसळली असल्याने पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून निमाच्या वतीने सुमारे १५ लाख रुपयांचा निधी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागांत महापुराने थैमान घातले असून, मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत आहे. जिल्ह्यातील सायखेडा, चांदोरी तसेच सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यांमध्ये अनेक पूरग्रस्त विविध जीवनावश्यक सुविधांपासून वंचित आहेत. शासकीय व विविध स्तरावर मदतीचा ओघ सुरू असून, नाशिकमधीलनाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) ही औद्योगिक संघटनादेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहे. सामाजिक जाणीव व मानवतावादी दृष्टिकोन जोपासत निमाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनास १४ लाख २६ हजार २४८ रु पयांचा निधी सुपूर्द केला.
राज्य शासनातर्फे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांना सदर मदतीचा धनादेश निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, निमाच्या औद्योगिक धोरण व विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, कार्यकारिणी सदस्य संजय महाजन यांच्या शिष्टमंडळातर्फे मुंबई येथे मंत्रालयात सादर करण्यात आला. निमातर्फे प्रदान करण्यात आलेल्या अर्थसहाय्याबाबत उभय मान्यवरांनी प्रशंसा व्यक्त केली. सदर नैसर्गिक आपत्तीत विस्कळीत झालेले जीवनमान पूर्ववत व्हावे यासाठी होत असलेल्या प्रयत्नांत निमा सदैव शासनासोबत असल्याचा विश्वास यावेळी निमा शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना दिला. निमा शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेतली व विविध औद्योगिक विषयांवर चर्चा केली.