निमगाव वाकडा आरोग्य केंद्राला कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 06:53 PM2021-04-17T18:53:29+5:302021-04-17T18:54:00+5:30
लासलगाव : चांगल्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अनेक आरोग्य कर्मचारीच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाले आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी वर्गासह नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.
लासलगाव : चांगल्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अनेक आरोग्य कर्मचारीच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाले आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी वर्गासह नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.
निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रोज पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी बाधित होताना दिसत आहेत. जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्याच्यासह कुटुंबीयांवर निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात यशस्वी उपचार करण्यात आले होते. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पहिला कोरोना रुग्ण सापडताच पिंपळगावनजिक बरोबरच परिसराची घरोघरी तपासणी प्रभावीपणे राबवली होती. चांगल्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव वाकडा आता मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारीच मोठ्या प्रमाणावर बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची संंख्या कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार व लसीकरण कसे करायचे, हा मोठा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा राहिला आहे. लासलगाव येथील रुग्णांची संख्या सध्या आटोक्यात दिसत आहे; परंतु ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी प्रतिबंधक क्षेत्राची निर्मिती केली असून, सर्व प्रभागात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली असल्याची माहिती लासलगावचे विकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली.
लिलाव ठरताहेत स्प्रेडर्स
लासलगावसह पिंपळगाव बसवंत, निफाड, सायखेडा या ठिकाणी शेतीमालाचे लिलाव मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. शेतीमालाच्या विक्रीनंतर त्याचे पॅकिंग व मालवाहतूक हे टप्पे पार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल व कुशल मजुरांची गरज भासते, तसेच कांदा खळ्यांवरही काम करणाऱ्या हजारो महिला, पुरुष कामगारांची संख्या मोठी असते. त्यामुळे संसर्ग होऊन रुग्णसंख्येत भर पडत आहे.