नऊशे कोटी रुपये पडून
By admin | Published: November 19, 2016 12:32 AM2016-11-19T00:32:36+5:302016-11-19T00:42:18+5:30
क्षमता संपली : कोट्यवधी रुपयांच्या नोटा ठेवायच्या कुठे ? नागरी बँकांना प्रश्न
संजय पाठक नाशिक
गेल्या बुधवारपासून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा नागरी सहकारी बॅँकांमध्ये डिपॉझिट झाल्यानंतर आजमितीला नऊशे कोटी रुपये जमा झाले असून, नागरी बॅँकांची साठवणूक क्षमताच संपली आहे. स्टेट बॅँकेकडे अशीच परिस्थिती असल्याने या नोटा ठेवायच्या कुठे, असा प्रश्न नागरी बॅँकांना पडला आहे.
नाशिक जिल्ह्यात ४४ नागरी सहकारी बॅँका असून, लाखो नागरिकांचे खाती त्यात आहेत. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली; मात्र त्याचबरोबर पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा सर्व बॅँकांमध्ये जमा करता येतील असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दररोज हजारो नागरिक बॅँकांमध्ये नोटा जमा करीत आहेत. नागरी सहकारी बॅँकाकडेही ८० ते ९० कोटी रुपयांची रक्कम रोज जमा होत आहेत. शुक्रवारपर्यंत सुमारे ९०० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. साधारणत: जमा होणारी रक्कम बॅँका अन्य बॅँकांत डिपॉझिट करतात, आता या बाद होणाऱ्या नोटा स्टेट बॅँकेला द्याव्या लागणार आहेत. मात्र, ४४ नागरी सहकारी बॅँका एका बाजूला आणि एक स्टेट बॅँक एका बाजूला अशी रक्कम जमा होण्याची स्थिती आहे. म्हणजे एकट्या स्टेट बॅँकेकडेच सातशे आठशे कोटी रुपये जमा असून त्यांच्याकडेच नोटा ठेवायला जागा नाही. त्यामुळे त्या नागरी बॅँकांकडून नोटाच स्वीकारत नसल्याची गंभीर स्थिती आहे.
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्या तरी या नोटा सुरक्षितपणे स्टेट बॅँकांच्या माध्यमातून जमा करण्यासाठी मुळातच त्या स्टेट बॅँकांनी स्वीकरणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरी बॅँक असोसिएशनने बराच प्रयत्न केल्यानंतर काही प्रमाणात नोटा स्वीकारल्या जात आहेत. म्हणजेच एखाद्या बॅँकेने आपल्याकडे जमलेले दोन ते तीन कोटी रुपये जमा करून घेण्यास सांगितल्यानंतर जेमतेम पन्नास लाख रुपयेच स्टेट बॅँक घेते. त्यामुळे नागरी बॅँकांना अद्याप दिलासा मिळाला नसून, आता जमा असलेली रक्कम कशी सांभाळावी या विवंचनेत नागरी बॅँक संचालक सापडले आहे.