वडाळागावात ट्रकच्या धडकेत नऊ महिन्यांची गर्भवती महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:04 AM2018-08-17T00:04:42+5:302018-08-17T00:05:55+5:30
संतप्त जमावाने अपघातग्रस्त ट्रक व पोलीस वाहनावर दगडफेक केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या ह्रदयद्रावक घटनेत महिलेच्या पोटातील नऊ महिन्यांचे अर्भकदेखील गर्भाबाहेर येऊन मृत्यूमुखी पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नाशिक : वडाळागावातील शंभर फुटी रिंगरोडवरील पांढरी आई देवी चौकामधून रस्ता ओलांडत असताना गुरुवारी (दि.१६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास गर्भवती महिलेला भरधाव ट्रकने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. संतप्त जमावाने अपघातग्रस्त ट्रक व पोलीस वाहनावर दगडफेक केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या ह्रदयद्रावक घटनेत महिलेच्या पोटातील नऊ महिन्यांचे अर्भकदेखील गर्भाबाहेर येऊन मृत्यूमुखी पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अवघ्या चार दिवसांवर महिलेची प्रसूती येऊन ठेपली होती, असे तीच्या जवळच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे
इंदिरानगरकडून घरकुल प्रकल्पासमोरुन वडाळागावमार्गे नाशिकरोडकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने (एम.एच.१८ बीए ००४८) रस्ता ओलांडणाऱ्या इरम इरफान शेख (१९) या विवाहितेला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून ती काही फुटापर्यंत चिरडली गेली. या दुर्दैवी अपघातात नऊ महिन्यांचे अर्भकही पोटातून बाहेर आल्याने मृत पावले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वडाळागाव परिसर हादरला आहे. अपघाताची माहिती पोलीस व रुग्णवाहिकेला देण्यात आली; मात्र रुग्णवाहिका घटनास्थळी उशिरा पोहचली. तोपर्यंत संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली होती. तसेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.
अपघाताची बातमी गावात वाºयासारखी पसरताच घटनास्थळी सुमारे पाचशेहून अधिक लोकांचा जमाव जमला होता. रुग्णवाहिकादेखील वेळेवर पोहचू शकली नाही. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळ गाठले; मात्र जमावाने त्यांच्या वाहनाच्या दिशेने दगड भिरकावले. तसेच अपघातग्रस्त ट्रकवरही दगडफेक केली. पोलीस वाहनातून इरमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जिल्हा रुग्णालय येथेही मोठा जमाव जमला होता.
घटनास्थळावरून ट्रकचालक प्रसाद शेषराव बुधवंत (३८) याने ट्रक घटनास्थळी सोडून पलायन केले होते. इंदिरानगर पोलिसांनी अवघ्या तासाभरात चालकास ताब्यात घेतल्याने संतप्त झालेला जमाव शांत झाला आणि तणावपूर्ण शांतता निर्माण झाली.
सावित्रीबाई फूले झोपडपट्टीतून जाणा-या शंभरफूटी श्री.श्री.रविशंकर या मार्गावर अंधाराचे साम्राज्य असते. या रस्त्याचे रुंदीकरण-डांबरीकरण झाल्याने वाहतूक वाढली असून भरधाव वाहने रस्त्यावरुन धावू लागली आहे. रस्त्याला लागूनच राजवाडा, रामोशीवाडा, तैबानगर, गरीब नवाज कॉलनी, अलमदिनानगर, सादिकनगर, महेबुबनगर, अण्णाभाऊ साठे चौक आदि उपनगरीय वसाहती आहे. या वसाहतींचे अंतर्गत जोडरस्ते या मोठ्या शंभरफूटी रस्त्याला येऊन मिळतात. त्यामुळे या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. तसेच पांढरी आई देवी चौक ते घरकुल इमारतीपर्यंत त्वरित पथदीप उभारण्याची मागणी जोर धरु लागली आहे. पथदीप बसविण्याची व्यवस्था अद्याप होत नसल्याने रात्री या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.