नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतील तीन जागांसाठी नऊ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 08:25 PM2018-01-19T20:25:16+5:302018-01-19T20:28:29+5:30
४ मार्चला निवडणूक : २५ जानेवारीला माघारी
नाशिक - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची पंचवार्षिक निवडणूक दि. ४ मार्च रोजी होणार असून नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून तीन जागांसाठी ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येत्या २५ जानेवारी रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. दरम्यान, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी गुरूवारी (दि.१८) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. आॅनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. नाशिक शाखेतून नियामक मंडळासाठी तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र कदम, कार्यवाह आणि मध्यवर्ती शाखेचे विद्यमान सदस्य सुनील ढगे, नाट्यसेवाचे राजेंद्र जाधव, सुरेश गायधनी, नाट्यलेखक दत्ता पाटील, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक सचिन शिंदे, फ्रेंडस् सर्कलचे संचालक विशाल जातेगावकर,प्रफुल्ल दीक्षित आणि गिरीश गर्गे यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शुक्रवारी अर्जाची छाननी झाली. त्यात, विशाल जातेगावकर यांच्या अर्जात सूचकाच्या विसंगत नावावर आक्षेप घेण्यात आला. त्यावर, मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी येत्या रविवारी (दि.२१) निर्णय देणार आहेत. नाशिक शाखेचे एकूण १०५० मतदार असून मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून किरण येवलेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीचा खर्च वाचविण्यासाठी स्थानिक स्तरावर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या २२ जानेवारीला उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून दि. २५ जानेवारीला अर्ज मागे घेता येणार आहे.
बिनविरोधसाठी हालचाली
नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विद्ममान पदाधिकाºयांनी प्रयत्न सुरू केले आहेत. परिषदेवर जाणकार व चांगल्या माणसांना संधी दिली जाणार असेल तर आपण त्यासाठी माघार घेण्यास तयार असल्याचे प्रा. रविंद्र कदम आणि सुनील ढगे यांनी म्हटले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जयप्रकाश जातेगावकर यांना विरोध म्हणून राजेंद्र जाधव यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. आता खुद्द जातेगावकर रिंगणात नसल्याने राजेंद्र जाधव यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. नाट्यलेखक दत्ता पाटील आणि सचिन शिंदे यांच्या उमेदवारीने निवडणुकीतील रंगत मात्र वाढली आहे.