महसूलच्या दप्तरी नऊ हजार केबलधारक
By Admin | Published: December 3, 2014 11:44 PM2014-12-03T23:44:44+5:302014-12-03T23:49:05+5:30
महसूलच्या दप्तरी नऊ हजार केबलधारक
मालेगाव : सुमारे दहा लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या मालेगाव शहरात केवळ नऊ हजार केबलधारक असून, पंचवीस हजार डिश अॅन्टेनाधारक असल्याची नोेंद येथील करमणूक विभागात आहे.
मालेगाव शहराच्या महापालिकेची हद्द सुमारे २० चौरस किमीपेक्षा जास्त असून, लोकसंख्या आठ ते दहा लाख आहे. शहरात ८० टक्के झोपडपट्टी असून, यात मोठ्या प्रमाणावर केबल टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. डिश टीव्हीला जास्त पैसे लागत असल्याने तसेच संबंधामुळे नोंदणीचे वेगळे पैसे मोजावे लागत नसल्याने केबल लावण्याकडे नागरिकांचा ओढा मोठा आहे. यासाठी विविध विभागात वेगवेगळे केबलचालक असून, ते महिन्याला १०० ते २५० रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. या सर्व जोडण्यांची माहिती महसूल विभागात नोंदणे आवश्यक आहे. मात्र केबल चालकांनी नऊ हजार ग्राहक केबलधारक असल्याची नोंद केली आहे. याउलट डिश टीव्हीधारकांची संख्या त्याच्या अडीच ते तीन पट जास्त असल्याची नोंद महसूलच्या दप्तरी आहे. शहरात सुमारे २५ ते ५० हजार स्वतंत्र बंगले किंवा पक्की घरे असून, उर्वरित नागरिक कच्ची घरे किंवा झोपडपट्टीत राहतात. अनेकांना डिश अॅन्टेना घेणे परवडत नाही. त्यात ८ ते ९ तास भारनियमन असते.
त्याकाळात टीव्ही बंद राहतो. यावेळी नाहक पैसे वाया जातात, तसेच डिशचे रिचार्ज संपले असता ताबडतोब प्रसारण बंद होते. याउलट केबलचालक महिनाभरापर्यंत थांबतात. त्यामुळे केबलधारकांची संख्या मोठी आहे. या केबलधारकांची संख्या लक्षात घेता ही नोंदणी केलेल्या ग्राहकांची संख्या अगदीच तुटपुंजी आहे. तहसीलदारांच्या अखत्यारित असलेल्या या विभागामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होेते. या नोंदणीची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)