कळवण तालुक्यातील नऊ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:49+5:302021-06-16T04:18:49+5:30
सध्या जरी परिस्थिती नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी मात्र ग्रामीण व आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपूर्वी भयावह ...
सध्या जरी परिस्थिती नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी मात्र ग्रामीण व आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपूर्वी भयावह परिस्थिती झाली होती. संक्रमितांसह मृत्यूसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे भल्याभल्यांना घाम फुटला होता. मात्र, अशा परिस्थितीतही कळवण तालुक्यातील एक, दोन नाही तर तब्बल नऊ गावांनी या घातक महामारीला गावाची सीमारेषा पार करू दिली नाही.
त्या गावांमध्ये गोपाळखडी ग्रामपंचायतीमधील बालापूर(४६२), वाडी बु. ग्रामपंचायतीमधील असोली (२१२), बापखेडा ग्रामपंचायतीमधील शेपूपाडा(६०६), कुमसाडी(७७३), विरशेत ग्रामपंचायतीमधील चाफापाडा (५६०), वेरुळे ग्रामपंचायतीमधील अंबापूर (६६१),भांडणे (हा) ग्रामपंचायतीमधील भांडणे हातगड (५९८), धार्डेदिगर ग्रामपंचायतीमधील पिंपळे खुर्द(६१९), मोहबारी(६४३) या कमी लोकसंख्या असलेल्या नऊ गावांचा समावेश आहे.
कोरोना रोगाची तीव्रता कमी व्हावी व रुग्णदर, मृत्यूदर वाढू नये म्हणून पहिल्या लाटेदरम्यान ग्रामपंचायत पातळीवर अनेक उपायोजना व कार्यक्रम राबवले गेले. कोरोनाची पहिली व दुसरी लाट थांबविता आली नाही. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण निघाले. त्यांच्यावर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली उपचार करून रुग्ण बरेही झाले. आता या दुसऱ्या लाटेत तर तालुका अक्षरशः हादरून गेलेला होता; परंतु अशाही परिस्थितीत या नऊ गावांतील लोकांचे योग्य नियोजन तथा वेळीच घेतलेली खबरदारी, राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, नागरिकांनी पाळलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचना आणि ग्रामस्थांचा दृढ निश्चय, सकारात्मक मानसिकता या सर्व बाबींमुळे तालुक्यातील नऊ गावे कोरोनामुक्त राहिली.
यामध्ये प्रशासकीय यंत्रणेतील विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तथा सहकार्य मोलाचे ठरले आहे. तसेच योग्यवेळी तपासणी, उपचार, टेस्टिंग, लसीकरण, जनजागृती यासुद्धा जमेच्या बाजू ठरलेल्या आहेत. गावात काेराेनाचा शिरकाव हाेऊ नये म्हणून ग्रामस्थांनी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर काही बंधने घातली हाेती. त्यासाठी गावाच्या सर्व सीमा सील केल्या हाेत्या. गावात साेडियम हायपाेक्लाेराइची नियमित फवारणी करून गावाचे निर्जंतुकीकरण, संपूर्ण स्वच्छता, प्रत्येकाने मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालक करणे या उपाययाेजनांवर विशेष भर दिला हाेता.
यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घराेघरी जाऊन नागरिकांना विश्वासात घेत जनजागृती केली हाेती. या काळात मनात भीती असली तरी प्रत्येकाने स्वत:साेबत इतरांची काळजी घेतल्याने हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया या नऊ गावांमधील नागरिकांनी व्यक्त केल्या.
कोट...
नागरिकांच्या मनातील काेराेनाची भीती दूर करण्यासाठी आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांची विशेष मदत झाली. यात ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी व आशा सेविकांनी सहकार्य केले. नागरिकांनी या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून काळजी घेतल्याने व उपाययाेजनांचे पालन केल्याने हे शक्य झाले.
- डॉ. सुधीर पाटील,
तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती
कळवण
कळवण तालुक्यातील नऊ गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक, आशा सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडली. या नऊ गावांमधील नागरिकांनी प्रशासनाला वेळाेवेळी योग्य सहकार्य केले. सूचनांचे पालन केले. नागरिकांचा समजूतदारपणा व सहकार्याची भूमिका आदर्श ठरली.
- नितीन पवार, आमदार, कळवण