निफाड तालुका आपत्ती व्यवस्थापनाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:12 AM2021-05-30T04:12:25+5:302021-05-30T04:12:25+5:30
पावसाळा अवघ्या दहा दिवसांवर आला असल्याने दरवर्षी इगतपुरी, त्रंबकेश्वर व इतर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास निफाड तालुक्यातील गोदाकाठीच्या ...
पावसाळा अवघ्या दहा दिवसांवर आला असल्याने दरवर्षी इगतपुरी, त्रंबकेश्वर व इतर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास निफाड तालुक्यातील गोदाकाठीच्या गावात, तसेच तालुक्यातील इतर गावांत पूरपरिस्थिती निर्माण होत असते. या पार्श्वभूमीवर निफाड विभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या गावातील ज्या लोकांच्या घरात पुराचे पाणी जाते त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे, नदी, नाले, मोठे ओहोळ यांचेवरील असलेल्या पूल यांची पाहणी करून व संरक्षण कठवडे काढणे, वीजपुरवठा, वैद्यकीय सेवा व औषध पुरवठा सुरळीत ठेवणे, याबाबत संबंधित विभागाला आदेश देण्यात आले आहे.
चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांसोबत चर्चा करून त्यांना बचावकार्य करताना लागणारे साहित्य लवकरात लवकर पुरवण्याचा आदेश दिला आहे.
या बैठकीला गटविकास अधिकारी संदीप कराड, पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी नवलसिंग चौहान, कृषी अधिकारी बटू पाटील, जलसंपदा नाशिक विभागाचे उपअभियंता अरुण निकम आदी उपस्थित होते.