निफाड तालुक्याला पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:15 AM2021-01-25T04:15:58+5:302021-01-25T04:15:58+5:30

तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार असे चित्र दिसू लागले आहे. तालुक्यात राजकीय ...

Niphad taluka Pimpalgaon market committee election observation | निफाड तालुक्याला पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीचे वेध

निफाड तालुक्याला पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीचे वेध

googlenewsNext

तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार असे चित्र दिसू लागले आहे. तालुक्यात राजकीय डावपेचांना सुरुवात झाल्याचे चित्र आहे. यावेळी सत्ताधारी आमदार आणि माजी आमदार यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे.

तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. दिलीप बनकर यांनी दीड वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत अनिल कदम यांचा पराभव केला. हा पराभव कदम यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आमदारकी हातातून निसटल्याने कदम यांनी आपला मोर्चा बाजार समितीच्या निवडणुकीकडे वळवला आहे. त्यांच्या गटाला बळकट करण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. आगामी बाजार समितीच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांमध्ये प्रतिष्ठेची लढाई बघायला मिळणार आहे. पिंपळगाव बाजार समितीवर २० वर्षांपासून दिलीप बनकर यांचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत कदम यांना पराभव मिळाल्याने त्यांनी बाजार समितीमधील बनकर यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्या गटाला सर्वाधिक जागा मिळाव्या यासाठी कदम प्रयत्न करणार आहेत.

पिंपळगाव बाजार समिती

पिंपळगाव बाजार समिती १९९६आधी लासलगाव बाजार समितीचाच एक भाग होती. या बाजार समितीला लासलगाव बाजार समितीची उपबाजार समिती मानलं जायचं. मात्र, १९९६मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार कल्याणराव पाटील आणि आमदार रावसाहेब कदम यांनी या बाजार समितीचे विभाजन केले. या विभाजनानंतर बाजार समितीच्या विकासात बनकर यांचा खारीचा वाटा आहे.

गेल्या बाजार समितीत निवडणुकीत बनकर आणि कदम यांच्यात राजकीय मांडवली

पिंपळगाव बाजार समितीची २०० कोटी रुपयांची स्थावर, रोख मालमत्ता आहे. या बाजार समितीचं १५ कोटी रुपयांचे उत्पन्न आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या चाव्या आपल्या खिशात राहाव्या यासाठी बनकर आणि कदम गटात चढाओढ सुरू झाली आहे. बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीत दोघी गटांमध्ये राजकीय मांडवली झाली होती. बाजार समितीच्या १७ जागांपैकी १३ जागा या बनकर गटाला, तर ४ जागा कदम गटाला देण्याचं दोघी गटातून निश्चित झालं होतं. त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र, या निवडणुकीत कदम यांनी तयारी सुरू केल्याने दोघी गटांमध्ये संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत कोण मतदान करतं?

बाजार समितीला शेतकरी गटाचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून आलेले प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी आणि हमाल-कामगार वर्ग यांचे प्रतिनिधी बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करतात.

Web Title: Niphad taluka Pimpalgaon market committee election observation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.