निफाडला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By admin | Published: October 16, 2016 01:25 AM2016-10-16T01:25:17+5:302016-10-16T01:25:55+5:30
निफाडला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
निफाड : येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या शेतवस्तीत घराजवळील गोठ्यात बांधलेल्या शेळीवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला. यावेळी गोठ्यात दोन गायी, दोन वासरेही होती. मात्र ती सुदैवाने वाचली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर वनविभागाला कळविण्यात आला. वन कर्मचाऱ्यांनी भेट देत पंचनामा केला.
येथील सुरेश फकीरराव जाधव हे शेतवस्तीवर राहातात. नेहमी प्रमाणे घराजवळच गोठ्यात दोन गायी, दोन वासरे व शेळी बांधलेली होती. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने तीन ते चार फूट उंच भिंतीवरून उडी मारून गोठ्यात प्रवेश केला व तिथे बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला. सकाळी जाधव यांना बिबट्याने शेळीला ठार केल्याचे लक्षात आले. त्यांनी ही घटना येवला वनविभागाला कळविली. वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक दिलीप अहिरे, विजय लोंढे, भय्या शेख घटनास्थळी गेले व पंचनामा केला.
निफाड तालुक्यात आतापर्यंत शेळ्या, कुत्रे, कोल्हे, रानडुकरांवर हल्ले करून फडशा पडला आहे. मागील महिन्यात कुरडगाव शिवारात एका गाईला बिबट्याने ठार केले होते.(वार्ताहर)