ऐन पावसाळ्यात निफाडचे राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 12:20 AM2021-07-22T00:20:48+5:302021-07-22T01:12:08+5:30
सायखेडा : शिवसेना पक्षाचे शिवसंपर्क अभियान, राष्ट्रवादी काँग्रेसची युवा संवाद यात्रा तर भाजप प्रवेशानंतर यतीन कदम यांच्या सुरू असलेल्या तळागाळातील गाठीभेटी यामुळे निफाड तालुक्यातील राजकारण ऐन पावसाळ्यात तापले आहे. सोशल मीडियावर विविध कार्यक्रमांच्या पोस्टने धुमाकूळ घातला असल्याने तीन वर्षे अगोदरच निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
सायखेडा : शिवसेना पक्षाचे शिवसंपर्क अभियान, राष्ट्रवादी काँग्रेसची युवा संवाद यात्रा तर भाजप प्रवेशानंतर यतीन कदम यांच्या सुरू असलेल्या तळागाळातील गाठीभेटी यामुळे निफाड तालुक्यातील राजकारण ऐन पावसाळ्यात तापले आहे. सोशल मीडियावर विविध कार्यक्रमांच्या पोस्टने धुमाकूळ घातला असल्याने तीन वर्षे अगोदरच निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
निफाडचेराजकारण हे नेहमीच जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत राहिले आहे. अनेक वर्षे गटा-गटात विस्तारलेले राजकारण अलीकडे पक्षीय राजकारणाच्या भोवती पिंगा घालत आहे. मोगल-बोरस्ते गट, मोगल-पवार गट असे अनेक वर्षे गटाचे राजकारण निफाड तालुक्यातील जनता अनुभवत आली आहे. मालोजीराव मोगल आणि माणिकराव बोरस्ते यांच्यानंतर मात्र काही वर्षांपासून बनकर-कदम यांच्या भोवती राजकारण फिरायला लागले. मंदाकिनी कदम यांच्या आठ वर्षे आमदारकीनंतर मात्र माजी आमदार अनिल कदम आणि विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या गटात राजकारण सुरू झाले. काका-अण्णा यांच्यातील विळ्या भोपळ्याचे राजकारण सर्व तालुका जाणून आहे. दोन वेळा बनकर यांचा पराभव झाल्यानंतर विजयासाठी कंबर कसलेल्या बनकर यांचा वारू विधानसभेत पोहचला. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असले तरी तालुक्यातील जनतेला मात्र पारंपरिक विरोधकांची छबी वारंवार पहायला मिळते आहे.
विविध विकास कामांच्या श्रेयवादावरून सोशल वॉर सातत्याने सुरू असते. कोणीच मागे हटायला तयार नसतो. आता मात्र शिवसेना पक्षाने शिवसंपर्क अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यकत्यांशी संवाद साधून पक्ष संघटना बळकटीवर भर दिला आहे. माजी आमदार अनिल कदम यांनी तालुका पिंजून काढत कार्यकर्त्यांतील मरगळ झटकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आमदार दिलीप बनकर यांनी रासाका, ड्रायपोर्ट यासारखे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावत संपर्क वाढवला आहे. त्यात भर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नुकतेच युवा संवाद कार्यक्रम हाती घेऊन काम गाव पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम सुरु केले आहे. सहा गटात संवाद यात्रा निमित्ताने कार्यकर्ते जुळवत आहेत.
तर भाजप पक्षात यतीन कदम यांनी नुकताच प्रवेश केला. त्यांनी गावागावात जाऊन कार्यकर्ते आणि माजी आमदार रावसाहेब व मंदाकिनी कदम यांचे विखुरलेले कार्यकर्ते गोळा करून पुन्हा एकदा गट निर्मिती करत असल्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
शिवसंपर्क अभियान, युवा संवाद कार्यक्रम आणि यतीन कदम यांच्या गाठीभेटी यामुळे निफाड तालुक्यातील राजकारण ऐन पावसाळ्यातदेखील तापले आहे