‘निर्भया’चा दणका : रिक्षात विसरलेला मोबाईल पुन्हा देण्यासाठी एक हजाराची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 08:50 PM2019-10-22T20:50:25+5:302019-10-22T20:56:32+5:30
तिने मैत्रिणीच्या मोबाईलवरून स्वत:च्या मोबाईलवर संपर्क केला. यावेळी रिक्षाचालक संशयित जगन्नाथ लक्ष्मण दिवे याना तिला ‘मोबाईल हवा असेल तर १ हजार रूपये घेऊन तू गिरणारे गावात ये’ असे सांगितले
नाशिक : शहरातील अशोकस्तंभ येथून रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन तरूणीचा मोबाइल त्या रिक्षात अनावधानाने राहिला. रिक्षाचालकाने तीचा मोबाईल ताब्यात घेतला. तरूणीने त्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्या रिक्षाचालकाने तीला थेट गिरणारे गावात एक हजार रूपये घेऊन बोलविले. त्यामुळे तरूणीला धक्का बसला व तिने वारंवार विनंती करूनदेखील रिक्षाचालकाने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे तरूणीने त्या रिक्षाचालकाची तक्रार थेट निर्भया पथक क्रमांक-२सोबत संपर्क साधत मदत मागितली. त्यानंतर निर्भया पथकाने थेटे गिरणारे गाव गाठून रिक्षाचालक व त्याच्या मित्रास ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कॉलेजरोड परिसरातील एका महाविद्यालयात शिकणारी व येथील मुलींच्या वस्तीगृहात राहणारी विद्यार्थिनी सोमवारी (दि.२१) खरेदी करून अशोकस्तंभ येथून रिक्षामध्ये (एम.एच १५ ईएच ४३८३) वस्तीगृहात जाण्यासाठी बसली. रिक्षातून उतरल्यानंतर तिने रिक्षाचालकाला भाड्याचे पैसे दिले या दरम्यान, ती स्वत:चा महगडा मोबाईल रिक्षामध्येच विसरली. वसतीगृहात पोहचल्यानंतर तिच्या लक्षात आले की २२ हजार रूपये किंमतीचा स्मार्टफोन रिक्षातच राहिला आहे. तिने मैत्रिणीच्या मोबाईलवरून स्वत:च्या मोबाईलवर संपर्क केला. यावेळी रिक्षाचालक संशयित जगन्नाथ लक्ष्मण दिवे याना तिला ‘मोबाईल हवा असेल तर १ हजार रूपये घेऊन तू गिरणारे गावात ये’ असे सांगितले. त्यामुळे तत्काळ विद्यार्थिनीने निर्भया पथकाशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तत्काळ सहायक निरिक्षक संगीता गावीत, उपनिरीक्षक राजकुमार तडवी, हवालदार सुभाष पाडवी, संजय कासर्ले, मयुरसिंग राठोड, जयश्री राठोड यांच्या पथकाने गिरणारे गाव गाठले. रिक्षाक्रमांकावरून संशयित दिवे व त्याचा साथीदार गोपीनाथ लक्ष्मण गोलाड यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी मोबाईल काढून दिला. दोघांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिसांच्या हवाली केले आहे.