शाळेच्या दिंडीत ‘निर्भया’चा सहभाग; माहितीपत्रकांद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 03:09 PM2019-07-13T15:09:50+5:302019-07-13T15:12:22+5:30
नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शाळा-महाविदयलयांचा परिसर असो किंवा महिलांच्या वर्दळीची अन्य ठिकाणे अशा सर्वच ...
नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शाळा-महाविदयलयांचा परिसर असो किंवा महिलांच्या वर्दळीची अन्य ठिकाणे अशा सर्वच भागांवर सध्या ‘निर्भया’ लक्ष ठेवून आहे. निर्भयाशी अधिकाधिक महिला, युवतींनी जोडले जावे यासाठी शाळा-महाविदयलयांमध्ये पोहचवून पोलीस आयुक्तालयाच्या निर्भया पथकांकडून उपक्रम राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महिला पोलिसांचे निर्भया पथक क्रमांक-३ने सिडको परिसरातील जनता विद्यालयाच्या शालेय मुलांच्या दिंडीत सहभाग घेतला. दिंडीच्या माध्यमातून परिसरात फेरफटका मारून महिलांसोबत पोलीस महिला कर्मचाऱ्यांनी संवाद साधत त्यांना माहितीपत्रके वाटप केली.पोलीस आयुक्तालय स्तरावर महिनाभरापासून निर्भया पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या निर्भया पथकांची वाहनेदेखील साधी असून त्यांची राहणीही साधीच आहे. साध्या वेशातील या पोलीस महिला कर्मचाऱ्यांकडून महिला, युवतींची छेड काढणाºयांना धडा शिकविला जात आहे. त्यांच्याजवळ लहान आकाराचा छुपा कॅमेरा असून टवाळखोरांचा प्रताप कॅमेरा अचूक टिपतो. त्यानंतर महिला पोलीस त्या टवाळखोराला ताब्यात घेऊन त्याच्या छेड काढण्याच्या पध्दतीचे गांभीर्य लक्षात घेत कारवाई करतात. अल्पवयीन मुले असल्यास त्यांना समज देऊन त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत समुपदेश पोलीस ठाण्यात केले जाते. तसेच काही टवाळखोर, रोडरोमीयो जे सराईत असून त्यांच्यात कुठल्याहीप्रकारे सुधारणा होणार नसल्याचे संकेत मिळाल्यास त्यांचा गुन्हेगारीचा पर्वइतिहास तपासून संबंधितांवर गुन्हेदेखील ‘निर्भया’ दाखल करते.
दरम्यान, जनता विद्यालयाच्या शाळकरी आषाढी दिंडीत निर्भया पथक क्रमांक-३च्या उपनिरिक्षक छाया देवरे, तेलूरे, कावेरी गांगुर्डे आदिंनी सहभागी होऊन परिसरातून फेरफटका मारला. शाळकरी दिंडीत महिला पोलिसांचा सहभाग लक्षवेधी ठरला. दिंडीच्या अग्रभागी निर्भया पथकाची माहिती देणारा फलक विद्यार्थ्यांनी हाती धरला होता. यावेळी परिसरातील रहिवाशी महिलांना माहितीपत्रके देत पोलीस महिलांकडून ‘निर्भया’संकल्पना समजावून दिली जात होती. माहिती पत्रकांवर निर्भयाची मदत कधी, कोठे, कोणाला घेता येईल या बाबतची माहिती देण्यात आली होती. तसेच संपर्क क्रमांकही नमूद करण्यात आले होते.