उपनगराध्यक्षपदी निर्मला भदाणे
By admin | Published: December 30, 2016 11:23 PM2016-12-30T23:23:22+5:302016-12-30T23:24:10+5:30
सटाण्यात बिनविरोध निवड : शहर विकास आघाडी; भाजपाची सत्ता स्थापन
सटाणा : संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी शहर विकास आघाडी व भाजपाने हातमिळवणी करत भाजपाच्या निर्मला एकनाथ भदाणे या बिनविरोध निवडून आल्या, तर स्वीकृत नगरसेवकपदीही आघाडीच्या डॉ. विद्या सोनवणे व भाजपाचे मनोहर देवरे यांची निवड करून पालिकेत आघाडी व भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. या सत्तास्थापनेमुळे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी भाजपा पक्षांतराचे स्पष्ट संकेत दिल्याने आगामी काळात शहराबरोबरच तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. येथील पालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीचे सुनील मोरे यांनी करिष्मा दाखविल्यानंतर शहर विकासासाठी मोरे यांनी भाजपाकडे जाण्याचा मार्ग पसंत केला होता. भाजपाच्या काही बंडखोरांनी पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटीदेखील घडवून आणल्या होत्या, मात्र त्याला विरोध करून मोरे यांचा मार्ग खडतर केला होता. दरम्यान, दोन दिवसांपासून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे व नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शहर विकासासाठी एकत्र येत सत्ता स्थापण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र पदांच्या वाटाघाटीवरून चर्चा फिस्कटली आणि सत्ता स्थापनेच्या आशा मावळल्या होत्या. आज पालिका सभागृहात नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी सुनील मोरे यांनी उपनगराध्यक्षपदाच्या व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी नगरसेवकांची विशेष सभा बोलावली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या निर्मला भदाणे, राष्ट्रवादीचे काका सोनवणे, शमा मन्सुरी, शहर विकास आघाडीच्या सुवर्णा नंदाळे यांनी निर्धारित वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अखेरच्या क्षणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, निरीक्षक नंदकुमार खैरनार, तालुकाध्यक्ष संजय भामरे व आघाडीचे नगराध्यक्ष सुनील मोरे, गटनेते संदीप सोनवणे यांची गुप्त बैठक होऊन एकत्रित सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला. त्यानंतर आघाडीच्या उमेदवार सुवर्णा नंदाळे यांनी अंतिम क्षणी अर्ज माघारी घेऊन भाजपाच्या उमेदवार निर्मला भदाणे यांना बाय दिला. आघाडी आणि भाजपाच्या हातमिळवणीमुळे आणि अपेक्षित संख्याबळ नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार काका सोनवणे व शमा मन्सुरी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निर्मला भदाणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर गुरुवारी स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निर्धारित वेळेत दाखल करण्यात आलेले अर्ज आज बंद लिफाफ्यात मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्याकडे पाठविण्यात आले होते. तो बंद लिफाफा आज नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या दोन जागांसाठी भाजपाकडून किशोर भांगडिया, सुहास पवार, मनोहर देवरे, आघाडीकडून डॉ.विद्या सोनवणे तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून फारूख शेख यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज छाननीत भांगडिया, पवार, शेख या तिघांचे अर्ज अवैध ठरल्याने स्वीकृत नगरसेवकपदी मनोहर देवरे व डॉ.विद्या सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे मोरे यांनी घोषित केले. बिनविरोध निवडीनंतर नगराध्यक्ष मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल, नारळ देऊन सत्कार केला. त्यानंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष निर्मला भदाणे, नगराध्यक्ष सुनील मोरे, स्वीकृत नगरसेवक मनोहर देवरे, डॉ.विद्या सोनवणे, नगरसेवक दिनकर सोनवणे, संदीप सोनवणे, महेश देवरे, काका सोनवणे, बाळू बागुल, राहुल सोनवणे, राकेश खैरनार, दीपक पाकळे, मुन्ना शेख, सोनाली बैताडे, सुनीता मोरकर, संगीता देवरे आदिंनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (वार्ताहर)