कॉँग्रेसच्या निर्मला गावीत यांचा आमदारकीचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 05:06 PM2019-08-20T17:06:34+5:302019-08-20T17:06:45+5:30
विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द : आज शिवसेनेत प्रवेश
वाडिव-हे : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.२०) होणारा शिवसेना प्रवेश सेना आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे स्थगित होऊन तो आता बुधवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता होणार आहे.
आमदार निर्मला गावित यांनी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सेना प्रवेशाचा मुहूर्त मंगळवारी दुपारी ४ वाजता मातोश्रीवर निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार, मतदारसंघातून मोठ्या संख्येने गावित समर्थक मुंबईकडे रवाना होणार होते. परंतु, सेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे मातोश्रीवरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे निर्मला गावित यांचाही पक्षप्रवेश तूर्त स्थगित करण्यात आला. आता हा प्रवेश सोहळा बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान निर्मला गावीत यांच्या शिवसेना प्रवेशासाठी शेकडो कार्यकर्र्त्यानी घोटी टोलनाक्यावरून मुंबईकडे मार्गक्र मण केले होते. मंगळवारी गावित यांनी विधिमंडळात जाऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपुर्द करत पक्षांतरात कुठलीही अडचण उद्भवू नये याची दक्षता घेतली. यावेळी गावित यांच्या समवेत राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते.