माजी आमदार डॉ.निशिगंधा मोगल यांनी भारतीय सेनेला दिली वीस लाखांची मदत..!
By अझहर शेख | Published: October 29, 2020 04:39 PM2020-10-29T16:39:57+5:302020-10-29T16:48:10+5:30
मोगल यांनी दागिण्यांइतकी २० लाखांची रक्कम भारतीय सेनेला पाठवून आपले देशप्रेम व भारतीय सेनेविषयी असलेली कृतज्ञतेची आणि अभिमानाची भावना अनोख्या पध्दतीने दाखवून दिली आहे.
नाशिक : भारतीय सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा त्याग अमुल्य आहे. देशसेवेसाठी निडरपणे आपले सैनिक सीमांचे रक्षण करतात त्या सैनिकांचे हात बळकट करणे व त्यांच्याप्रती आपल्या मनात असलेला आदरभाव वेळोवेळी दाखवून देणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्यच आहे. माजी आमदार डॉ. निशिगंधाताई मोगल यांनी एक आगळावेगळा आदर्श समाजाच्या लोकप्रतिनिधींपुढे मांडला आहे. त्यांनी आपल्याकडील स्त्री धनाच्या माध्यमातून भारतीय सेनेला थेट वीस लाखांची मदत दिली आहे.
कुठल्याही प्रतिकुल परिस्थतीचा विचार न करता भारतीय सेना राजस्थानच्या वाळवंटापासून सियाचीन व जम्मु-काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशापर्यंत देशाच्या सीमांचे रक्षण करते. जवान सीमेवर तैनात असताना त्यांच्यापासून कटुंबीय दुरावले जातात आणि त्या कुटुंबीयांचाही त्याग तितकाच महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे शहीदांच्या वीरपत्नी, दिव्यांग जवान, माजी सैनिकांसह जवानांच्या कल्याणकारी कामांसाठी भारतीय सेनेच्या ध्वजनिधीमध्ये मोगल यांनी आपले दागिण्यांच्या माध्यमातून वीस लाखांची मदत भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडे पाठविली आहे. मोगल यांनी सुरुवातीला त्यांच्याकडील सर्व दागिणे भारतीय सेनेला द्यायचे ठरविले मात्र भारतीय सेना कुठल्याहीप्रकारचे दागिणे कोणाकडूनही देणगीस्वरुपातसुध्दा स्विकारत नाही. यामुळे मोगल यांनी दागिण्यांइतकी २० लाखांची रक्कम भारतीय सेनेला पाठवून आपले देशप्रेम व भारतीय सेनेविषयी असलेली कृतज्ञतेची आणि अभिमानाची भावना अनोख्या पध्दतीने दाखवून दिली आहे.
भारतीय सेनेने पत्राद्वारे मानले आभार
भारत सरकारच्या रक्षा मंत्रालय व सैनिकी बोर्डद्वारे लेखा विभागाचे सहसंचालक लेफ्टनंट कर्नल सौमित्र मिश्रा यांनी नुकतेच काही दिवसांपुर्वी डॉ. निशिगंधा मोगल यांना लेखी पत्र पाठवून आभार मानले आहे. त्यांनी मोगल यांनी दाखविलेल्या स्वयंस्फूर्तीने दाखविलेल्या भारतीय सेना व जवानांच्या कुटुंबियांविषयीच्या दातृत्व भावनेचे कौतुक केले आहे.
कारगील युध्दापासून मी मनात निश्चय केला होता. पाच वर्षांपुर्वी जेव्हा मी कारगीलला प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा तर काळजात धस्स् झाले. इतक्या भयावह परिसरात जवानांनी झुंज देत आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे यावर्षी मी भारतीय सेनेला सुमारे ५५ तोळे सोन्याच्या दागिण्यांद्वारे २० लाखांची मदत दिली. सेनेचे मिळाले आभारपत्र वाचून मनाला समाधान होत आहे. भारतीय सेना व त्यांचे कुटुंबीय आपल्यासाठी जो त्याग करत देशसेवा बजावतात, त्यापुढे ही मदतदेखील क्षुल्लकच आहे, असे मी मानते.
-डॉ. निशिगंधा मोगल, माजी आमदार
भारतीय सेनेविषयी मोगलताई यांनी दाखविलेली दातृत्व समाजाला प्रेरणा देणारे आहे. जवान व त्यांच्या कुटुंबियांविषयीची दाखिवलेली कृतज्ञता अभिमानास्पद आहे. यामुळे भारतीय जवानांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल अधिक उंचविण्यास मदत होईल.
-वीरपत्नी रेखा खैरनार, अध्यक्ष, त्रिदल वीर नारी, माता-पिता संघटना