दमणगंगेचे पाणी अडविल्यास धरणे भरतील : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 02:04 AM2018-10-25T02:04:39+5:302018-10-25T02:05:10+5:30
नाशिक-नगरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे तर ठाणे जिल्ह्यातील वाहून जाणारे पाणी अडवून तेथे धरण बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या धरणामुळे नाशिक, नगरमधील सर्व धरणे पूर्ण भरतीलच शिवाय जायकवाडीही भरेल आणि पाण्यावरून होणारी भांडणे होणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन आणि जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नाशिक : नाशिक-नगरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे तर ठाणे जिल्ह्यातील वाहून जाणारे पाणी अडवून तेथे धरण बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या धरणामुळे नाशिक, नगरमधील सर्व धरणे पूर्ण भरतीलच शिवाय जायकवाडीही भरेल आणि पाण्यावरून होणारी भांडणे होणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन आणि जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केले. के.के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कर्मयोगी आणि कृषी तपस्वी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, अनिल कदम, राहुल अहेर, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, नीलिमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गडकरी म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील पाणी हे समुद्रात वाहून जाते. हे पाणी अडवून ठाणे जिल्ह्यात धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे धरण बांधण्यासाठी ३० हजार कोटींचा खर्च येणार असून, ९० टक्के खर्च करण्याची तयारी केंद्राने दर्शविली आहे. ठाणे जिल्ह्यात धरण बांधल्यामुळे नाशिक, नगरमधील सर्व धरणे पूर्ण भरतीलच शिवाय जायकवाडी धरणदेखील भरले जाईल त्यामुळे पाण्यावरून निर्माण होणारे वाद होणार नाहीत.
नाशिक, अहमदनगर येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा-पिंजाळ आणि तापी-नर्मदा या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, १ लाख कोटी रुपये सिंचनासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत, असे गडकरी यांनी म्हणाले. निफाड येथे ड्रायपोर्टला मंजुरी मिळाली असल्याचे सांगून विक्र ीकरावरून प्रकरण अडले असल्याने राज्य सरकारने तोडगा काढल्यास नाशिकच्या शेतकऱ्यांना द्राक्षे, कांद्याच्या आयात-निर्यातीसाठी मुंबईला जाण्याची गरज उरणार नाही, असेही गडकरी यावेळी म्हणाले. शिक्षणसंस्थांनी आता व्यावसायिक तसेच तांत्रिक शिक्षण देण्याबरोबरच संशोधनात्मक शिक्षणावर भर देणे अपेक्षित असल्याचे सांगितले. शिक्षणसंस्था चालकांनी चांगले नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी शिक्षणसंस्थांपुढील अडचणी सांगून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती शासनाकडून देण्यास विलंब होत असल्याचे म्हटले. प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी प्रास्ताविक केले.
कर्मयोगी, कृषितपस्वी पुरस्कारांचे वितरण
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात योगदान देणारे सनदी अधिकारी पुण्याच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांना ‘कृषितपस्वी’, तर घरकुल परिवार संस्थेच्या अध्यक्ष विद्या फडके यांना ‘कर्मयोगी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रु पये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. शेखर गायकवाड परदेशात असल्याने त्यांच्या पत्नी वंदना गायकवाड यांनी पुरस्कार स्वीकारला.
शब्द पाळा, गडकरींचा आदर्श घ्या
या सोहळ्यात के. के. वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी व्यासपीठावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावले. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापही दिलेली नाही अशी आठवण करून देत केंद्रीय मंत्री गडकरी यांचा आदर्श घ्या असा सल्ला महाजन यांना दिला. त्यानंतर भाषणासाठी उठलेले महाजन यांनी वाघ यांना आपल्यासारख्या मोठ्या संस्थाचालकांनी ठरविले तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ शकता, त्यासाठी शासनावर अवलंबून राहाण्याची गरज नसल्याचे सांगितले.