हरित महामार्गामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 02:01 AM2018-10-25T02:01:35+5:302018-10-25T02:02:13+5:30
रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडली जातात, या झाडांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जातात; मात्र ते फारसे यशस्वी होत नाहीत़ तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणे आवश्यक असून, यासाठी ‘हरित महामार्ग’ प्रकल्पाचा संकल्प करण्यात आला आहे़
नाशिक : रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडली जातात, या झाडांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जातात; मात्र ते फारसे यशस्वी होत नाहीत़ तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणे आवश्यक असून, यासाठी ‘हरित महामार्ग’ प्रकल्पाचा संकल्प करण्यात आला आहे़ येस बँकेच्या सीएसआर फंडातून हरित पथ कंपनीने मुंबई-आग्रा महामार्गावर ४५ हजार झाडे लावण्यात आली आहेत़ देशातील विविध कंपन्या, एनजीओ, शैक्षणिक संस्था, बँका यांनी हरित महामार्गासाठी पुढाकार घेतल्यास देशापुढील पाणी व वायू प्रदूषण कमी करण्यास मदत मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले़ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील देशातील पहिल्या हरित महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते बुधवारी (दि़ २४) झाले, त्यावेळी ते बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, येस बँकेने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील पिंपळगाव ते गोंदे व गोंदे ते घोटी हा ४० किलोमीटरचा रस्ता हरित महामार्गासाठी दत्तक घेतला आहे़ बँकेच्या या फंडातून हरित पथ या कंपनीने आॅक्टोबर २०१७ पासून कामास सुरुवात केली असून, रस्त्याच्या दुतर्फा ११ हजार ७९० तर मध्यभागी ३० हजार वृक्ष लावले आहेत़ या मार्गावरील एकूण वृक्षांची संख्या ४५ हजार ३७२ असून, पाच वर्षे या वृक्षांचा सांभाळ केला जाणार आहे़ हरित पथ कंपनीचे संचालक तथा भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी सांगितले की, वृक्षारोपणापूर्वी ड्रोनने रस्त्याचा सर्र्व्हे करण्यात आला होता़ या वृक्षांच्या संगोपनाच्या माहितीसाठी अॅप बनविण्यात आले असून, रिअल टाइम मॉनेटरिंग होते व बँकेच्या अधिकाऱ्यांना ते बॅँकेतून पाहता येते़ यावेळी गडकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ लोकार्पण सोहळ्यास येस फाउण्डेशनच्या प्रेरणा लांगा, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, अमोल जोशी आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते़