निवृत्तीनाथ मंदिरदेखील आजपासून खुले होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 12:59 AM2021-10-07T00:59:46+5:302021-10-07T01:02:32+5:30
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ, श्री संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर, श्रीस्वामी समर्थ मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर आदी दर्शन सेवा शासनाच्या नियमावलीप्रमाणे उद्या गुरुवार (दि.७) पासून सुरू होणार असल्याने भाविकांसह हंगामी व्यावसायिक सुखावले.
त्र्यंबकेश्वर : येथील श्री त्र्यंबकेश्वरमंदिर, कुशावर्त तीर्थ, श्री संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर, श्रीस्वामी समर्थ मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर आदी दर्शन सेवा शासनाच्या नियमावलीप्रमाणे उद्या गुरुवार (दि.७) पासून सुरू होणार असल्याने भाविकांसह हंगामी व्यावसायिक सुखावले.
कुशावर्त तीर्थ, श्री निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर उद्या (दि.७) ऑक्टोबरपासून कोविड १९च्या पार्श्वभूमीवर व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून दर्शन सेवा नित्य नैमित्तिक पूजा आरती आदी सुरू राहणार आहेत. अर्थात मंदिर बंद होते तेव्हाही नित्य नैमित्तिक पूजा होत होती. तथापि भाविकांना परवानगी नव्हती. आता भाविकदेखील पूजेसमयी उपस्थित राहू शकणार आहेत.
दरम्यान, बंदच्या कालावधीत मंदिराच्या जीर्णोध्दाराचे कामही बंद होते. सध्या फक्त आठ फूट काम करणे बाकी आहे. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी यापूर्वी विश्वस्त मंडळ पदासाठी अर्ज बोलावण्यात आले होते. पण पहिल्या वेळेस धर्मदाय आयुक्तांनी कोरोनाच्या कारणास्तव पहिली यादी फेटाळून पुनश्च अर्ज बोलावण्यात आले होते. मात्र तीही यादी फेटाळण्यात येऊन सहायक धर्मदाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पाच लोकांची प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. पण या समितीला खर्चाच्या मर्यादा आहेत. मंदिराचा जीर्णोध्दार करताना ठेकेदार आदींना एकावेळी जास्त पेमेंट देऊ शकत नसल्याने प्रशासकीय समिती रद्द करून ठोस निर्णय घेणारे विश्वस्त मंडळ नियुक्त करावे, अशी मागणी वारकरी सांप्रदायिक माजी विश्वस्त मंडळाचे काही सदस्य यांनी केली आहे.
चौकट....
विश्वस्त मंडळ आवश्यक
शासनाकडून निधी आणणे, प्रसाद योजनांची कामे करणे यासाठी विश्वस्त मंडळ नियुक्त करणे गरजेचे आहे. अजूनही मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी बरेच दिवस लागणार आहेत. मंदिराचे असे अनेक विषय आहेत त्यासाठी विश्वस्त मंडळच असावयास हवे. आता मंदिर उघडले आहे. मंदिरात जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार उजव्या बाजूने बंद केले आहे. तर डाव्या बाजूने प्रवेश करून, मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.