निवृत्तीनाथा,धाव आता पाव आता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:16 AM2021-01-20T04:16:27+5:302021-01-20T04:16:27+5:30
त्र्यंबकेश्वर येथे संत शिरोमणी निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी सध्या भलती चढाओढ सुरू आहे. विश्वस्त मंडळावर तशी वर्षानुवर्षे अनेक मंडळी ...
त्र्यंबकेश्वर येथे संत शिरोमणी निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी सध्या भलती चढाओढ सुरू आहे. विश्वस्त मंडळावर तशी वर्षानुवर्षे अनेक मंडळी राहिली आहेत. मात्र आता अशा संस्थावरील नियुक्त्या या पारदर्शकपणे, ठराविक वेळेत व्हाव्या, त्या विषयाशी संबंधित आणि खऱ्या अर्थाने सेवेसाठी येणाऱ्यांची निवड व्हावी यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. केवळ हौसे साठी किंवा पदे मिळवण्यासाठी येणाऱ्यांना त्याचा अनुभव आल्याचेही वृत्त आहे.
विश्वस्तपदाच्या नऊ जागांसाठी तब्बल १८७ सेवेकरी इच्छुक! मग काय परीक्षा खडतर असणारच. हा विषय हाताळणाऱ्यांनी तशी ती घेतलीही.
विश्वस्तपदासाठी असलेल्या काही प्रमुख अटींमध्ये तो स्थानिक रहिवासी असावा, त्याला विश्वस्त असावा असे तर नियम आहेच परंतु वारकरी देखील विश्वस्त असावा असेही निकष आहेत. त्यामुळेच खरी परीक्षा झाली. मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी हरीपाठातील भजने म्हणावयास सांगितली तर कुणाला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचे जीवन कार्य विचारले. संजीवन समाधी आणि जिवंत समाधीत फरक काय, असे अनेक प्रश्न केल्यानंतर काहींची अडचण झाल्याचेही समजते. काही इच्छुक तर अत्यंत वल्ली! मुलाखतीसाठी येतानाच जणू वारीसाठी आल्याचा पोशाख करून आले आणि हरीपाठ विचारल्यानंतर प्रत्यक्ष कृतीने हरीपाठ सादर करून दाखवू लागले अशीही चर्चा आहे.
अखेर मुलाखतींचे सोपस्कार गेल्या १२ जानेवारीस सुफळ संपूर्ण झाले. परंतु कारभारी कोण यांचा फैसला मात्र जाहीर झालेला नाही. त्यामुळे विश्वस्तपदाची स्वप्ने बघणारे अनेक जण हरीपाठ करीत आहेत तर कुणी निवृत्तीनाथालाच धाव पाव आता असे साकडे घालत आहेत. पुढील महिन्यात एकादशीला संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे, तोपर्यंत तरी कारभारी झालो तर मान काही औरच राहील अशा अपेक्षेने अनेकांची तगमग सुरू आहे.
इन्फो...
पदासाठी वाट्टेल ते...
विश्वस्तपद अलीकडे मानाचे झाल्याने अनेकजण त्यासाठी केवळ डोळे लावून बसले आहेत असे नाही तर काही जण या ना त्या मार्गाने नऊ नशिबवान विश्वस्तांमध्ये आपले नाव असावे यासाठी धावपळ करीत आहेत. कुणी आमदाराची चिठ्ठी आणतो तर कुणी खासदार दूताला धाडतो असे अनेक प्रकारांच्या चर्चा सध्या सुरू आहेत. अर्थात प्रयत्नांती धर्मादाय आयुक्त अशी साऱ्यांची अवस्था आहे.