मनपा कर्मचाऱ्यांना
By admin | Published: October 16, 2016 02:19 AM2016-10-16T02:19:52+5:302016-10-16T02:20:38+5:30
महापौरांची घोषणा :वैद्यकीय विम्याचीही दिवाळीभेट
नाशिक : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर अशोक मुर्तडक यांनी केली. सानुग्रह अनुदानाबरोबरच महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा काढण्याचाही निर्णय घेत महापौरांनी दिवाळीची आणखी एक भेट दिली आहे. मनपावर १० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
शुक्रवारी झालेल्या महासभेत महापालिका कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानुसार महापौरांनी शनिवारी (दि.१५) सर्वपक्षीय गटनेते, आयुक्त आणि कर्मचारी युनियनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविली होती. आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. यंदा दिवाळीनिमित्त सुमारे ७ हजार ४०० कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. मागील वर्षी १३ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. महापालिकेची एकूणच आर्थिक स्थिती आणि उत्पन्नाची बाजू लक्षात घेता त्यात ५०० रुपयांची भर घालण्याची तयारी आयुक्तांनी दर्शविली. सदर सानुग्रह अनुदान हे महापालिकेच्या आस्थापनावरील सर्व कर्मचारी, मानधन तसेच रोजंदारीवरील कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना मिळणार आहे.