कालिदास बंदमुळे महापालिकेला २० लाख रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:10 PM2020-06-14T18:10:07+5:302020-06-14T18:12:09+5:30
नाशिक - लॉक डाऊन आणि संचार बंदी मुळे नाशिक महापालिकेचे महाकवी कालिदास कलामंदिर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असून त्यामुळे ...
नाशिक - लॉक डाऊन आणि संचार बंदी मुळे नाशिक महापालिकेचे महाकवी कालिदास कलामंदिर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असून त्यामुळे सुमारे पन्नासहून अधिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे पालिकेला सुमारे 20 लाख रुपयांचा फटका बसला आहे तर दादासाहेब गायकवाड सभागृह आणि पंडित पलुस्कर सभागृह बंद असल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या महिन्यात कोरोनाचे संकट आल्यामुळे केंद्र सरकारने लॉक डाऊन आणि संचारबंदी लागू केली त्यानंतर मे महिन्यापासून लॉक डाऊन मध्ये शीथीलता दिली असली तरी अत्यावश्यक सेवा आणि उद्योग व्यवसायांना परवानगी दिली आहे. मात्र, आता जनजीवन सुरळीत होत असले तरी अद्यापही चित्रपट- नाटक यासारख्या गर्दी जमा होतील त्या ठिकाणांना कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला देखील मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.
मार्च महिन्यापासून आतापर्यंत कालिदास कलामंदिर आणि दादासाहेब गायकवाड सभागृहातील एकूण 50 हुन अधिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे भाडे मिळणे तर सोडाच रद्द कार्यक्रमांची अनामत रक्कम सुद्धा आयोजकांना द्यावी लागली आहे.
कालिदास कलामंदिरात दर महिन्याला होणारी नाटके, परिषदा, बैठका कार्यक्रमातून महापालिकेला पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते दादासाहेब गायकवाड सभागृह आणि पंडित पलुस्कर सभागृह त्यांच्या भाड्यातून सुमारे तीन ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळते पंडित पलुस्कर सभागृहाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे सध्या ते बंद आहे.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह केवळ मोठ्या कार्यक्रमांसाठी भाड्याने घेतले जाते.कालिदास कलामंदिर नियमितपणे वापरात असले तरी यात होणारे नाटके आणि अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे महापालिकेला आत्तापर्यंत 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने जनजीवन सुरळीत करण्यासाठी अनेक निर्बंध शिथिल केले असले तरी नाटकासारख्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होणारी गर्दी बघता अद्याप या ठिकाणी कार्यक्रम घेण्यास परवानगी नाही त्यामुळे कालिदास चे नुकसान दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या लॉक डाऊन मुळे रंगभूमीवर नवीन नाटके येऊ शकत नाहीत. त्यामुळे नाटकांचे चित्रीकरण करून ते पाहण्यासाठी रसिकांना उपलब्ध करून देण्याची अभिनव सूचना अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी केली होती मात्र नाटकाचे चित्रीकरण करायचे असले तरी कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांची एकूण संख्या ही पाच पेक्षा अधिक होणार असल्यामुळे अशा प्रकारची परवानगी मिळेल आणि कालिदास कलामंदिर मध्ये अशा प्रकारचे चित्रीकरण होणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले