महापालिकेची कोरोना लॅब १५ दिवसात कार्यान्वित हेाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:45+5:302021-03-14T04:14:45+5:30
नाशिक- कोरोना चाचणीचे नमुने औरंगाबाद येथे प्रयोगशाळेत पाठवले जात असून हे नमुने मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहत असल्याने आता ...
नाशिक- कोरोना चाचणीचे नमुने औरंगाबाद येथे प्रयोगशाळेत पाठवले जात असून हे नमुने मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहत असल्याने आता १५ दिवसात महापालिकेची प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे. त्याच बरोबर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगाशाळेची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे चाचणी अहवाल प्रलंबित राहणार नाही अशी ग्वाही आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत दिली. या शिवाय शहरातील दुकानदार, रिक्षाचालक, भाजी विक्रेते यांच्यासारख्या जनसंपर्कात येणाऱ्यांच्या अँटीजेन चाचण्या पुन्हा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल ५० हजार किटस खरेदी करण्याचे आदेशही आयुक्तांनी शनिवारी (दि.१३) झालेल्या बैठकीत दिले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना चाचण्या देखील वाढवल्या जाणार आहेत. त्याच बरोबर त्यांचे अहवाल झटपट प्राप्त झाल्यास पुढील कार्यवाही करणे शक्य होणार असल्याने महापालिकेने स्वमालकीची प्रयोगशाळा सुरू करण्यावर भर दिला आहे. नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात १५ दिवसात कार्यान्वित होणाऱ्या नव्या प्रयोगशाळेची दैनंदिन दोन हजार नमुने तपासणीची क्षमता आहे, त्यामुळे बऱ्यापैकी लवकर अहवाल मिळू शकतील.
जनसंपर्क असलेल्या व्यवसायिकांकडून काेरोना स्प्रेड होऊ नये यासाठी आता दुकानदार, कारागीर, रिक्षाचालक यांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे.
इन्फो...
महापालिकेने गेल्यावेळी ८७० कर्मचारी वैद्यकीय विभागात तीन महिन्यासाठी कंत्राटी पध्दतीने भरले होते आणि त्यांना मुदतवाढ दिली होती. आताही २७६ कर्मचारी १ मार्च पासून नियुक्त करण्यात आले असून त्यातील २०० कर्मचारी हजर झाले आहे. आरोग्य, वैद्यकीय विभागात ५५० नियमित कर्मचारी आहेत. मनपाच्या नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयात एमआरआय, सिटी स्कॅन यंत्रासाठी आवश्यक ते कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच गरजेनुसार स्थानिक रेडिओलॉजिस्टची ऑनलाईन सेवा घेतली जाणार आहे.
इन्फो..
हेल्पलाईन सुरू
खासगी रुग्णालयात बेडसची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ९६०७६२३३६६ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यावर पहिल्या दिवशी या क्रमांकावर ७३ नागरिकांनी संपर्क साधला. त्यातील ५१ जणांना बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय आरोग्य नियमांचे कुठेही उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी २३१७२९२ आणि ९६०७४३२२३३ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.