मनपाचे तीन तरणतलाव सुरू
By admin | Published: August 7, 2016 01:50 AM2016-08-07T01:50:09+5:302016-08-07T01:50:27+5:30
पावसाने दिलासा : सावरकर तरणतलाव मंगळवारपासून खुला
नाशिक : शहरात समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने महापालिकेने गेल्या चार महिन्यांपासून पूर्णवेळ बंद ठेवलेले जलतरणतलाव पुन्हा खुले करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार सिडको, सातपूर आणि नाशिकरोड येथील तरणतलाव दि. २ आॅगस्टपासून सुरू झाले आहेत, तर त्र्यंबकरोडवरील वीर सावरकर जलतरणतलाव येत्या मंगळवार (दि.९)पासून खुला करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी दिली.
शहरात पाणीकपात सुरू असतानाच राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेने आपले पाचही जलतरणतलाव दि. २१ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेने नाशिक पश्चिम विभागातील वीर सावरकर तरणतलाव, नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरणतलाव, सिडकोतील स्वामी विवेकानंद तरणतलाव, सातपूर येथील क्लब हाउसमधील तरणतलाव आणि पंचवटीतील श्रीकांत ठाकरे तरणतलाव पूर्ण वेळ बंद ठेवले होते. महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासून शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली, त्याचवेळी मनपाच्या पाचही तरणतलावांतील सायंकाळचे सत्र बंद करण्यात आले होते. केवळ सकाळचे तीन सत्र चालविले जात होते. त्यानंतर २२ फेबु्रवारीपासून विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने दर सोमवारी साप्ताहिक सुटीसह दोन दिवस तरणतलाव बंद ठेवण्यात येत होता.