Ration Card : ...तर रेशन होऊ शकतं बंद; १२०० रेशन कार्डधारकांची आधार नोंदणीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 01:46 PM2022-06-16T13:46:44+5:302022-06-16T13:54:06+5:30
नाशिक : शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डधारकांनी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. यासाठीची डेडलाइन ...
नाशिक : शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डधारकांनी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. यासाठीची डेडलाइन ३० जून ठेवण्यात आली आहे. रेशन कार्डधारकांना तोपर्यंत आधार नोंदणी करावी लागणार आहे. आधार लिंक नसले तर मात्र काहीशी अडचण निर्माण होऊ शकते.
पात्र रेशन कार्डधारकांपर्यंत धान्य पोहोचविण्यासाठी अनेकविध उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. जे गरजवंत आहेत त्यांनाच धान्य मिळावे, यासाठी रेशनकार्ड आधार लिंकिंग आवश्यक करण्यात आले आहे. पॉस मशीनचा उपयोग सुरू झाल्याने संंबंधित लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचविले जात असले तरी आधार लिकिंग महत्त्वाचे आहे. कार्डधारकातील कोणत्याही एकाचे जरी आधार लिकिंग असले तरी रेशन सुरू राहील. मात्र, सर्व सदस्यांचे लिंकिंग होणे गरजेचे आहे.
३० जूनपर्यंत मुदतवाढ
रेशनकार्ड आधार लिकिंग करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आधार लिंकिंग करण्यासाठी यापूर्वी ३१ मार्च इतकी मुदत होती आता यामध्ये वाढ करण्यात येऊन ३० जून करण्यात आली आहे. ‘वन नेशन, वन रेशन’ उपक्रम जाहीर करण्यात आल्यापासून रेशन कार्ड आधार लिकिंग करणे गरजेचे झाले आहे.
... तर ही कागदपत्रे आवश्यक
१) मतदान ओळखपत्र तसेच आधार कार्ड ही दोन महत्त्वाची कागदपत्रे यासाठी अत्यावश्यक आहेत.
२) रहिवासी पुरावा म्हणून वीजबिल तसेच घर मालकाचे संमतीपत्र, भाडेपट्टा करार, कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे.
रेशन कार्डाची आधार नोंदणी
जिल्ह्यात आत्तापर्यंत १२ लाखांच्या पुढे आधार लिंकिंगचे काम झालेले आहे. मार्च महिन्यात त्यामध्ये आणखी वाढ झाली असून, जून अखेरपर्यंत आधार लिकिंग अधिक वाढणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य, दारिद्र्य रेषेखालील, अन्नपूर्णा अशा योजनांमध्ये उत्पन्न गटानुसार कार्डधारकांची विभागणी केली जाते. प्रत्येक घटकाला आधार लिंकिंग करावे लागणार आहे.
बाराशे नोंदणी अजूनही बाकी
आधार लिंकिंग करण्यासाठी रेशन दुकानदारांकडून माहिती दिली जात असून, त्यांच्याकडून प्रक्रियादेखील केली जाते. कुटुंबातील कुणा एकाचे लिंकिंग झाल्यानंतर मात्र इतर सदस्यांचे लिंकिंग करण्याकडे दुर्लक्ष होते, अशी संख्या मोठी आहे. जून अखेरपर्यंत मुदत देण्यात आल्यामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
धान्यापासून कुणीही वंचित नाही
आधार लिंकिंग करण्यात आलेले नसले तरी त्यामुळे रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित नसल्याचा दावा पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. रेशन कार्डावर असलेल्या कुटुंबातील सदस्यांपैकी कुणाही एकाचे लिंकिंग असेल तरीही धान्य दिले जाते. धान्यापासून कुणीही वंचित ठेवले जात नसल्याचे सांगण्यात आले.