खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना ‘नो ॲडमिशन’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:34 AM2021-04-23T01:34:37+5:302021-04-23T01:35:10+5:30
नाशिक जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून बहुतांश रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच नाही किंवा असलाच तरी तो केवळ तिथे सध्या असलेल्या ऑक्सिजन बेडवरील रुग्णांना पुरेल इतकाच आहे. त्यामुळे जर कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन बेड हवा असेल, तर त्याला ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे, पण ऑक्सिजनचा साठा नसल्याने बेड देता येऊ शकत नाही, असे सांगून दाखल करून घेण्यासदेखील असमर्थता व्यक्त करण्यात येऊ लागल्याने आता गंभीर रुग्णांना कोणत्याच खासगी रुग्णालयात प्रवेश मिळेनासा झाला आहे.
नाशिक : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून बहुतांश रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच नाही किंवा असलाच तरी तो केवळ तिथे सध्या असलेल्या ऑक्सिजन बेडवरील रुग्णांना पुरेल इतकाच आहे. त्यामुळे जर कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन बेड हवा असेल, तर त्याला ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे, पण ऑक्सिजनचा साठा नसल्याने बेड देता येऊ शकत नाही, असे सांगून दाखल करून घेण्यासदेखील असमर्थता व्यक्त करण्यात येऊ लागल्याने आता गंभीर रुग्णांना कोणत्याच खासगी रुग्णालयात प्रवेश मिळेनासा झाला आहे. तर काही रुग्णालयांनी त्यांच्याकडील ऑक्सिजन संपुष्टात येऊ लागल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांना रुग्ण स्थलांतरित करण्यास सांगितल्याने काही खासगी .रुग्णालयांमध्येदेखील गोंधळ निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यात गत आठवड्यापासूनच मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यात बुधवारी झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची प्रचंड प्रमाणात गळती झाल्याने नाशिकला येणारा ऑक्सिजनचा सर्व साठा शासकीय रुग्णालयांकडे वळविण्यात आला. त्यामुळे खासगी रुग्णालयांना बुधवारी ऑक्सिजनचा पुरवठाच होऊ न शकल्याने अनेक रुग्णालयांमध्ये अत्यंत बिकट समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णालयांकडून तर ऑक्सिजन लागणारे रुग्ण दाखल करून घेण्यासदेखील नकार दिला जात आहे. त्यामुळे एचआरसीटी स्कोअर बारापेक्षा अधिक असलेल्या किंवा ऑक्सिजन लागू शकणाऱ्या रुग्णांना दाखल कुठे करायचे हा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे.
गत आठवड्यापासूनच ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी गत आठवड्यात शनिवारी १३९ मेट्रिक टन इतकी होती. तर प्रत्यक्षात पुरवठा ८७ मेट्रिक टन इतकाच होता. तब्बल ५२ मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा गत आठवड्यातच होता. तसेच हा तुटवडा रुग्णसंख्या वाढीनुसार वाढत जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळ तसेच अन्य तज्ज्ञांनी दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात सध्याच्या घडीला किमान ८० मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
रुग्ण स्थलांतरित करण्याच्या सूचना
आम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा लवकर उपलब्ध होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. त्यामुळे या परिस्थितीत आपले ऑक्सिजनवरील रुग्ण लवकरात लवकर स्थलांतरित करावेत, असे संदेश काही खासगी रुग्णालयांकडून त्यांच्या कुटुंबीयांना सकाळपासूनच देण्यात आले. त्यामुळे जिथे कुठे ऑक्सिजन असेल, तिथे रुग्ण स्थलांतरित करण्यास प्रारंभ झाला. काही रुग्णालयांमध्ये तर त्यामुळे वादाचे प्रसंगदेखील ओढवले. मात्र, ऑक्सिजन मिळू शकत नसल्याने आम्ही तुम्हाला वेळीच सावध केले असून, यापुढील जबाबदारी कुटुंबीयांची असेल.
रुग्णालयाचे पोलीस स्टेशनला पत्र
पंचवटीतील एका खासगी रुग्णालयावर तर ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने रुग्ण स्थलांतरित करण्यासाठी पोलीस स्टेशनचीच मदत मागण्याची वेळ आली. सध्या आमच्याकडील आयसीयू विभागात रुग्णांना ऑक्सिजन सुरू आहे. मात्र, ऑक्सिजन लवकरच संपुष्टात येणार असल्याने ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावल्यास आमची जबाबदारी राहणार नाही, याची पूर्वकल्पना रुग्णांच्या नातेवाइकांना दिली आहे. त्यामुळे रुग्ण हलवण्यासाठी आपली मदत आणि सहकार्य मिळावे, अशी विनंतीच पंचवटी पोलीस स्टेशनला केली होती.