कोई सरहद्द ना इन्हे रोके !; नाशिक शहर व परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:34 PM2018-11-14T23:34:48+5:302018-11-15T00:11:45+5:30
थंडीच्या हंगामाला सुरुवात होताच नाशिक शहर व परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य, गंगापूर धरण, कश्यपी धरण परिसरात देश-विदेशातील पक्ष्यांच्या प्रजाती येण्यास सुरुवात झाली आहे.
गंगापूररोड : थंडीच्या हंगामाला सुरुवात होताच नाशिक शहर व परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य, गंगापूर धरण, कश्यपी धरण परिसरात देश-विदेशातील पक्ष्यांच्या प्रजाती येण्यास सुरुवात झाली आहे. यातील ग्रासलँड प्रकारातील पक्षी तर थेट नाशिक शहरात दिसू लागले असून, सूर्योदयाच्या वेळी त्यांचा किलबिलाट घुमू लागला आहे. त्यांच्या मोहक करामती पाहण्याची नामी संधीच आता शहरवासीयांना मिळाली आहे. लिटिल ग्रीन बी इटर अर्थात ‘वेडा राघू’ हा हिवाळ्याची साद देणारा पक्षीही शहरात दाखल झाला आहे. हिरवा-पोपटी रंग, बारीक लांब बाकदार चोच, काहीशी लांब शेपटी असणारा चिमुकला ‘वेडा राघू’ नाशिक शहरात हमखास नजरेस पडू लागला आहे. तर विटकरी रंगाची आणि छातीवर काळी ठिबके असलेली ‘स्कॅली ब्रीस्टेड मुनिया’ हे चिमणीच्या आकाराचे लहानसे पक्षीही विणीच्या हंगामासाठी शहरात दाखल झाल्याचे दिसू लागले आहेत.
गंगापूर धरण व कश्यपी धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या दलदली जलाशयांवर बार हेडेड गुज, ग्रे लॅक गुज, ब्राम्हणी डक, शाउलर, गार्गनी, व्हाईट आयबिझ, ग्लॉसी आयबिझ, ब्लॅक आयबिझ, पेंटेड स्टॉर्क, स्पून बिल, ओपन बिल स्टॉर्क, कॉमन क्रेन, मार्श हेरियार, फ्लेमिंगो, कुट, पाणकावळे, ग्रे वॅगटेल, यलो वॅगटेल, रेड मुनिया, इंडियन सिल्व्हर बिल, ब्लॅक विंग स्टील्ट, हेरॉन, व्हाईट ब्रिस्टेड किंगफिशर, पाईड किंगफिशर, स्मॉल किंगफिशर, इंडियन रोलर, हनी बझार्ड, कापशी घार, ग्रे हेरॉन, कॉमन पोचार्ड, इंडियन रॉबिन, लिटिल रिंग प्लॉवर, रोसी स्टर्लिंग, सँड पायपर, इंडियन ग्रे हॉर्नबील आदी ४० ते ५० वेगवेगळ्या प्रजातींचे पाणपक्षी व गवताळ भागात आढळणाऱ्या पक्ष्यांची थंडीच्या दिवसात हजेरी लावण्यास सुरुवात झाली आहे. यातील पाणपक्ष्यांच्या काही प्रजाती गंगापूर धरण परिसरात व ग्रासलँड प्रकारातील पक्षी नाशिक शहरातदेखील आढळू लागल्याने पक्षी अभ्यासकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आफ्रिका, युरोप, रशिया, श्रीलंका, म्यानमार आदी विदेशातून हजारो किलोमीटरचे अंतर पार करून हे पक्षी अन्न-पाण्यासाठी व इथल्या विपुल मत्स्यसंपदेवर ताव मारण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पाणथळ व दलदलीच्या ठिकाणांवर दाखल होत असतात. अशाच काही पक्ष्यांच्या प्रजाती आता शहराजवळील पाणवठ्यांवर नजरेस पडत आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे थंडीचे सलग चार महिने हे पक्षी नाशिक परिसरात वास्तव्यास येत असल्याचे अभ्यासांती समोर आले आहे. स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांसह हिमालयातून येणाºया पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी डिसेंबर महिन्याचा कालावधी उत्तम असल्याचे मानले जाते.
चार ते सहा महिने राहणार मुक्काम
युरोप, सायबेरियात शीतकाळाला सुरुवात झाली की तेथील थंडी आवाक्याबाहेर निघून जाते. सर्वत्र बर्फाची पांढरी चादर तयार झाली की पक्ष्यांना अन्न-पाण्याची कमतरता भासू लागते. त्यामुळे या भागातील पक्षी दक्षिणेकडील उबदार प्रदेशात म्हणजेच उत्तर आफ्रिका, मध्यपूर्व इराण, आग्नेय आशियात व भारतीय उपखंडात स्थलांतर करतात. या ठिकाणी ते चार ते सहा महिने वास्तव्य करतात.
इथल्या विपुल मत्स्यसंपदेवर ताव मारतात. या काळात शरीरात ऊर्जेचा मुबलक साठा केला जातो. युरोप व सायबेरियात उष्णकाळाला सुरुवात झाली की मग हे पक्षी पुन्हा मायदेशी परतण्यासाठी प्रवासाला सुरुवात करतात.
भारतीय उपखंडात दोन मार्गांनी पक्षी स्थलांतर करून येतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा मार्ग हा इंडस व्हॅली मार्ग म्हणून ओळखला जातो. हा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेला व पाणथळ पक्ष्यांचा चौथ्या क्रमांकाचा मार्ग म्हणून ओळखला जातो.
भारतात येणारे बहुतेक पक्षी याच मार्गाने येत असल्याचे अभ्यासांती समोर आले आहे. पक्ष्यांचा दुसरा हवाई मार्ग हा ईशान्येकडून ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो.