तिवरेच काय, पण कोणतंही धरण खेकड्यांमुळे फुटणं अशक्यच; तज्ज्ञांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 06:30 PM2019-07-06T18:30:10+5:302019-07-06T21:13:34+5:30

तिवरे धरण फुटल्यानंतर प्रशासनात ब्लेमगेम सुरू

But no dam canals can be broken: D. M. More | तिवरेच काय, पण कोणतंही धरण खेकड्यांमुळे फुटणं अशक्यच; तज्ज्ञांचं मत

तिवरेच काय, पण कोणतंही धरण खेकड्यांमुळे फुटणं अशक्यच; तज्ज्ञांचं मत

googlenewsNext
ठळक मुद्देधरणांच्या सुरक्षीतेकडे होतेय दुर्लक्षअनेक समित्या नियुक्त पण उपयोग नाही

नाशिक : तिवरे धरण फुटून जीवितहानी झाली. आता ब्लेम गेम सुरू झाल्यानंतर हे धरण चक्क खेकड्यांमुळे फुटल्याचे जलसंधारण राज्यमंत्री तर्कट तानाजी सावंत यांनी केल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली असली तरी खेकड्यांमुळे अशाप्रकारे धरण किंवा कालवे फुटत नसतात. धरण फुटण्याची वेगवेगळी शास्त्रोक्त कारणे आहेत. धरणाच्या सुरक्षिततेविषयी अभियंत्याची उदासीनता आणि दुर्लक्ष तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची कोणत्याही सरकारची नसलेली मानसिकता असे अनेक दोष व्यवस्थेत असल्याचे स्पष्ट मत मेरीचे (महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन संस्था) माजी महासंचालक आणि जलतज्ज्ञ डी. एम. मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

प्रश्न : तिवरे धरण फुटल्यानंतर खेकड्यांना दोष दिला जात आहे, त्याविषयी तुमचे काय मत आहे.
मोरे : खेकड्यांमुळे धरण फुटते असे म्हणणे चुकीचे आहे. धरणाची रुंदी खूप असते. त्याशिवाय त्याची बांधणी मजबूत असते. त्यामुळे खेकड्यांनी धरण पोखरले म्हणून ते फुटले असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. धरण फुटण्याची अनेक कारणे आहेत. धरण बांधताना कामात त्रुटी असेल तर काळी माती योग्य पध्दतीने भरली नसेल किंवा त्याची दबाई योग्य पध्दतीने झाले नसेल तर धरण फुटू शकते, परंतु ते एकाएकी फुटत नाही. धरणातून बाहेर पडणारे पाणी नियमितपणे स्वच्छ असेल तर अडचण नसते. परंतु मातकट किंवा गढूळ पाणी बाहेर आले तर लक्षात घ्यायला पाहिजे. अशावेळी त्रुटीचा शोध घेऊन दुरुस्ती झाली पाहिजे. १९६१-६२ मध्ये पानशेत धरण फुटले तेव्हादेखील अशाच प्रकारे माती वाहून येत होती, त्यामुळे त्याकडे लक्ष दिले पाहिजे. परंतु मानवी चुका झाल्यानंतर त्यात खेकड्यांमुळे धरण फुटले, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. पुण्यात पर्वतीजवळ कालवा फुटला होता, तेव्हादेखील हेच कारण देण्यात आले होते.

प्रश्न : धरण सुरक्षिततेबाबत सध्या व्यवस्था कशी आहे, त्याचा कितपत उपयोग होतो?
मोरे : गेल्या दहा वर्षांपासून धरण सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी शासनाने अनेक समित्या नियुक्त केल्या आहेत. यात जलसंपदा खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सामावेश करून धरणांची पाहणी करून अभ्यासाचे काम देण्यात आले आहे, परंतु त्यातून काहीच साध्य झालेले नाही. संबंधित अभियंत्यांनी आणि खात्याने त्यातून काहीच धडा घेतला नाही. धरणांच्या सुरक्षिततेसाठी जागतिक बॅँकेने निधी मंजूर केला आहे. ९४० कोटी रुपयांचा हा निधी आहे, परंतु त्यावर निर्णय नाही. तिवरे धरणाची दुर्घटना घडल्यानंतर मेरीत अलीकडेच नाशिकमध्ये बैठक झाली. त्यात १६७ धरणांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्यक्रम ठरविण्याचे ठरवण्यात आले.

मुलाखत- संजय पाठक

 

Web Title: But no dam canals can be broken: D. M. More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.