सर्वसामान्यांना ‘नो-एन्ट्री’

By admin | Published: November 22, 2015 12:11 AM2015-11-22T00:11:59+5:302015-11-22T00:12:20+5:30

परिणाम जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनामुळे हाल; प्रचंड वाहतूक कोंडी

The 'no-entry' | सर्वसामान्यांना ‘नो-एन्ट्री’

सर्वसामान्यांना ‘नो-एन्ट्री’

Next

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी प्रवेशद्वारावर दुपारी बारा वाजेपासूनच सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराला छावणीचे स्वरूप आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाची दारे पोलिसांनी बंद केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ‘नो-एन्ट्री’ होती.
दुपारी बारा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी जमले होते. पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ सर्वांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी दीड वाजेनंतर शिवसेनेचे कार्यकर्तेही आंदोलनामध्ये सहभागी झाल्याने आंदोलनकर्त्यांची संख्या वाढली. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ठिय्या आंदोलन व भाषणे करीत असल्याने परिसर दणाणून गेला होता. माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, वत्सला खैरे, कविता कर्डक, नाना महाले, श्रीराम शेटे, भारती पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, दीपक पगार, अजय बोरस्ते आदि उपस्थित होते.
‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही,’ ‘नाशिककरांचे पाणी पळविणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवित निषेध नोंदविला. दरम्यान, दुपारी दोन वाजेच्या सुमारास पालकमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोहचला आणि आंदोलकर्त्यांनी धाव घेत ताफा तत्काळ अडविला. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने-सामने आल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसले होते.
आंदोलनाची धार तीव्र होताच सीबीएस सिग्नलवरून अशोकस्तंभाकडे जाणारा रस्ता दुपारी एक वाजेनंतर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला; मात्र त्यापूर्वी या रस्त्यावरून वाहतूक सुरूच होती. त्यामुळे काही आंदोलनकर्ते बिथरले आणि त्यांनी ‘रास्ता रोको’ करण्याचाही दीड वाजेच्या सुमारास प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून राखीव पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली. दोन वाजेच्या सुमारास पालकमंत्री येणार असल्याची खात्री पोलिसांना झाल्यानंतर पोलीस आयुक्त एस. जगनाथन, उपआयुक्त विजय पाटील हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जगनाथन यांनी बंदोबस्ताचा आढावा जाणून घेत आंदोलनकर्त्यांची समजूतही काढण्याच्या सूचना अन्य अधिकाऱ्यांना दिल्या; मात्र आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यासमोर येऊन टाळ्या वाजवित घोषणाबाजी करत अनोखे ‘स्वागत’ केले. (प्रतिनिधी)

Web Title: The 'no-entry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.