नांदूरमधमेश्वरसह कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात ‘नो-एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 08:36 PM2020-03-16T20:36:29+5:302020-03-16T20:42:10+5:30
विनापरवाना पर्यटकांची वाहने अभयारण्य क्षेत्रात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तत्काळ त्यांना अभयारण्यक्षेत्रातून बाहेर काढले जावे यासाठी चौकसपणे नियमित गस्त वाढवावी, असेही आदेशात त्यांनी म्हटले आहेत.
नाशिक : राज्यात कोरोना आजाराची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ३९ वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र दक्षता घेतली जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक वनवृत्त विभागाचे मुख्य वनसंरक्षक तथा वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी नांदूरमधमेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, यावल आणि अनेर डॅम हे चारही अभयारण्य ३१ मार्चपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश सोमवारी (दि.१६) काढले.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील प्रसिद्ध नांदूरमधमेश्वरसह अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा पर्यटन क्षेत्रातील कळसूबाई हरिशचंद्रगड अभयारण्य, धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम, जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात मोठ्या संख्येने पर्यटकांचा राबता असतो. त्यामुळे नाशिक वन्यजीव विभागाने या चारही अभयारण्यांचे प्रवेशद्वार मंगळवारपासून येत्या ३१ मार्चपर्यंत संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. याबाबतची सूचनापत्रक संबंधित वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपालांना रवाना करण्यात आले आहे. या अभयारण्यक्षेत्रात पर्यटकांची कुठल्याहीप्रकारे गर्दी होणार नाही, यासंबंधित दक्षता घेतली जावी, असे अंजनकर यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. पर्यटकांची वाहने अभयारण्यक्षेत्रात तपासणी नाक्यांवरून कोणत्याही मार्गाने प्रवेश करणार नाहीत, याबाबत संबंधित वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांनी काटेकोरपणे काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विनापरवाना पर्यटकांची वाहने अभयारण्य क्षेत्रात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तत्काळ त्यांना अभयारण्यक्षेत्रातून बाहेर काढले जावे यासाठी चौकसपणे नियमित गस्त वाढवावी, असेही आदेशात त्यांनी म्हटले आहेत. हा आदेश मंगळवारपासून लागू होणार आहे.