दंड नाही, तर मैदान झाडून स्वच्छ करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:18 AM2021-01-16T04:18:45+5:302021-01-16T04:18:45+5:30

शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई असून तरीही नागरिक कचरा टाकतात. त्यामुळे अस्वच्छता वाढते. परंतु अनेक ठिकाणी भाजी बाजार ...

No fine, sweep the ground! | दंड नाही, तर मैदान झाडून स्वच्छ करा !

दंड नाही, तर मैदान झाडून स्वच्छ करा !

Next

शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई असून तरीही नागरिक कचरा टाकतात. त्यामुळे अस्वच्छता वाढते. परंतु अनेक ठिकाणी भाजी बाजार भरल्यानंतर संबंधित विक्रेतेदेखील सर्व उरलेला पाला आणि अन्य निरुपयोगी भाज्या तेथेच फेकून निघून जातात. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तेथे स्वच्छता करावी लागते. शुक्रवारी (दि.१५) पंचवटीत प्रभाग क्रमांक एकमधील म्हसरूळ येथे असाच प्रकार घडला. या मार्केटच्या जागेवर कचरा टाकणाऱ्या भाजीविक्रेत्यांना मनपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटकले आणि दंड करण्याची तयारी केली. मात्र, आपल्याकडे दंड भरायला पैसेच नाही अशी पळवाट त्यांनी शोधली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे ऐकल्यावर त्यांना कचरा केला ना आता तोच साफ करा, असे सांगितले सात ते आठ विक्रेत्यांकडून मार्केटच्या त्या परिसराची साफसफाई करून घेतली. या आगळ्या-वेगळ्या दंडामुळे आता तरी संबंधित विक्रेते अस्वच्छता करणार नाही अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, महापालिकेने आठवडाभरातच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ३३ जणांकडून ५२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

इन्फो..

अस्वच्छता करणाऱ्यांकडून ३२ लाखांचा दंड

स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिका तयारी करीत असून गेल्या एप्रिलपासून आत्तापर्यंत शहरात अस्वच्छता करणाऱ्या ५ हजार ८३७ नागरिकांकडून ३२ लाख २९ लाख ४३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात नदी नाल्यात कचरा टाकणारे, प्लॅस्टिकच्या बॅग वापरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी मलबा टाकणाऱ्या अशा सर्वांवरच कारवाई करण्यात आली आहे. ८ ते १४ जानेवारी दरम्यान २२२ नागरिकांकडून २ लाख ६३ हजार ८१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

इन्फो..

कोराेनाचा धोका कायम असल्याने महापालिकेने आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवली आहे. आठवडाभरात मास्क न वापरणाऱ्या ७९ नागरिकांकडून १५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यत आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या सहा जणांकडून ५ हजार १५० रुपये, तर उघड्यावर लघुशंका करणाऱ्या पाच जणांकडून एक हजार रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे

Web Title: No fine, sweep the ground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.