निधी मिळेना, येवला तालुक्यात रस्त्यांची झाली दैना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:27+5:302021-08-24T04:18:27+5:30

येवला : शहरातून नाशिक - औरंगाबाद, नगर - धुळे हे राज्यमार्ग जातात. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांशी ...

No funds, roads in Yeola taluka are in dire straits! | निधी मिळेना, येवला तालुक्यात रस्त्यांची झाली दैना!

निधी मिळेना, येवला तालुक्यात रस्त्यांची झाली दैना!

Next

येवला : शहरातून नाशिक - औरंगाबाद, नगर - धुळे हे राज्यमार्ग जातात. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसाने त्यात अधिकच भर पडली आहे.

मंजूर असणारी, सुरू असणारी रस्ताकामे सततच्या पावसामुळे बंद आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गाचा फटका निधी उपलब्धतेलाही बसला. मागणीपेक्षा अतिशय कमी निधी उपलब्ध होत गेल्याने अनेक कामे रखडली आहेत.

शहरासह ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांबाबत ओरड आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असून अनेक रस्ते उखडून गेले आहेत. शहरातील रस्त्यांचीही दुरवस्था बनलेी आहे. वसाहत भागातील रस्त्यांचा प्रश्न तर फारच बिकट बनला आहे.

येवला शहरात सुमारे आठ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण झाले आहेत. सहा ते सात किलोमीटर रस्ते खडीकरण व डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत, तर १२ किलोमीटर रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. येवला शहरातील मुख्य बाजारपेठ ६०० मीटर रस्ता, लोणारीनगर भागातील रस्ते, सुलभानगर रस्ता, जहागीरदार कॉलनी भागातील रस्ते, समदपार्क, मिल्लतनगर, वेद कॉलनी, विठ्ठलनगर भागातील रस्ताकामे होणार आहेत.

तालुक्यात सुमारे दीड हजार किलोमीटरपेक्षा अधिक रस्त्यांचे जाळे आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ व २, जिल्हा परिषद इमारत व दळणवळण उपविभाग यांच्या माध्यमातून या रस्त्यांची कामे केली जातात, तर पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागाकडूनही तालुक्यातील काही रस्त्यांची कामे हाती घेतली जातात. विविध योजनांतर्गत गेल्या तीन वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी शहरासह तालुक्यातील रस्तेकामांसाठी उपलब्ध झालेला आहे. याअंतर्गत मोठ्या संख्येने रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण आदी कामे झाली, होत आहेत, तर काही होणार आहेत.

येवला शहरातील विंचूर चौफुलीवर वाहतुकीची होणारी कोंडी नित्याचीच बनली आहे. दिवसभरात किमान तीन-चार वेळा तरी वाहतुकीची कोंडी होते. या ठिकाणी उड्डाण पूल करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे.

इन्फो

या रस्त्यांची झाली दुरवस्था...

नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गाला जोडणारा मानोरी बुद्रुक ते मुखेड फाटा (पाच किलोमीटर रस्ता), देशमाने बु॥ ते नेउरगाव, देशमाने बु॥ ते जउळके, महामार्ग ते शिरसगाव (लैकि), देशमाने बु॥ ते वाहेगाव (ता. निफाड), देशमाने खुर्द ते देवगाव (ता. निफाड), देशमाने खुर्द ते नांदगाव (ता. निफाड), देशमाने खुर्द ते मानोरी खुर्द (ता. निफाड) या गावजोड रस्त्यांची दुर्दशा बनलेली आहे. एरंडगाव खुर्द ते धुळगाव, एरंडगाव बुद्रुक ते पाटोदा, एरंडगाव साईपूजा हॉटेलजवळील धुळगाव फाटा ते धुळगाव, एरंडगाव बु॥ ते दहेगावधुळ, एरंडगाव खुर्द ते साताळी, एरंडगाव बुद्रुक ते भिंगरे, जळगाव नेऊर ते जऊळके, धुळगाव ते एरंडगाव फाटा या रस्त्यांची अवस्था बिकट आहे. मुखेड फाटा ते मुखेड, मुखेड फाटा ते दत्तवाडी, मुखेड ते नेऊरगाव, मुखेड ते महालखेडा, मुखेड ते देवगाव या गावजोड महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

पाटोदा ते सातारे, पाटोदा ते दहेगाव, पिंपळगाव लेप दहेगाव ते जऊळके, मुखेड फाटा ठाणगाव ते खैरगव्हाण, ठाणगाव ते कानडी आडगाव रेपाल मुरमी, पाटोदा ते विखरणी विसापूर मुंगीबारी या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे.

फोटो- २३ येवला खबरबात

मानोरी बु॥ ते खडकीमाळ रस्त्याची झालेली दुरवस्था.

230821\23nsk_21_23082021_13.jpg

फोटो- २३ येवला खबरबातमानोरी बु॥ ते खडकीमाळ रस्त्याची झालेली दुरवस्था 

Web Title: No funds, roads in Yeola taluka are in dire straits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.