पोलिसांकडून नो हेल्मेट, नो पेट्रोल अभियानाची कसून तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:18 AM2021-08-14T04:18:46+5:302021-08-14T04:18:46+5:30
इंदिरानगर : पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या संकल्पनेनुसार विनाहेल्मेट वाहनधारक पेट्रोल घेण्यास ...
इंदिरानगर : पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या संकल्पनेनुसार विनाहेल्मेट वाहनधारक पेट्रोल घेण्यास आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी स्पष्ट केले, त्यासाठी पेट्रोलपंपचालकांनी हेल्मेटविषयी जनजागृती करणारे फलक लावण्याचे आवाहनही पोलिसांनी पंपचालकांना केले. तसेच सर्व पेट्रोलपंपावर २४ तास पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासनही पंपचालकांना दिले आहे.
पंचवटी : पोलीस ठाण्यातही अशाचप्रकारे सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावीत यांच्या अध्यक्षतेखाली पंचवटी आणि म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील पेट्रोलपंपचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी गत दोन-तीन वर्षांत हेल्मेट नसल्याने अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना १५ ऑगस्टला पंपावर उपस्थित ठेवून त्यांच्या माध्यमातून हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यासोबतच हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हेल्मेट वाटप कार्यक्रम प्रत्येक पंपावर राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या. वाहनधारकांना हेल्मेटची आवश्यकता असल्यास पंपावर शुल्क आकारून हेल्मेट उपलब्ध करून देण्याविषयीही या बैठकीत सुचित करण्यात आले. बैठकीला वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह अंकुश सोनजे, ओंकार धात्रक, कुणाल वनमाळी, मनोज चांडक, अमरजित कोहली, विनय पालीजा,मेहुल गांधी, अभिजित निपुंगे, एन. एल. गांधी, प्रदीप भामरे, प्रमोद गोसावी, आयुश पॉल, राकेश मिश्रा, एस. एम. खिरारी, मिलिंद कुलकर्णी, एम. जी. शर्मा, नीलेश शेटे, सतीश रौंदळ आदी पेट्रोलपंपचालक मालक उपस्थित होते.
सिडको : पोलीस ठाण्यातील बैठकीत विनाहेल्मेट पेट्रोल घेण्यास येणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल द्यावे, मात्र संबंधित व्यक्तीचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी सांगितले. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंपचालकांच्या बैठकीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे, संजय बेडवाल, उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, कैलास सोनवणे यांनी पेट्रोलपंपचालकांसमवेत संवाद साधला. पंपचालकांनी जनजागृती करण्याचे आवाहन करतानाच विनाहेल्मेट पेट्रोल घेण्यास येणाऱ्या ग्राहकांची माहिती वाहतूक शाखेला देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
130821\13nsk_41_13082021_13.jpg
अंबड पोलीस ठाण्यात पेट्रोल पंप चालकांत्या बैठकीत सुचना करताना साहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे समवेत संजय बेडवाल, उत्तम सोनवणे, कैलास सोनवणे