मदत नको, पूररेषा शिथिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:33 AM2019-08-14T01:33:45+5:302019-08-14T01:35:53+5:30
शहरातील सराफबाजार गेल्या आठवड्यात रविवारी (दि.४) गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेला. या भागातील भांडी व्यापारी व जंगम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे वारंवार येणाऱ्या पुरांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने व्यावसायिकांकडून पूररेषा शिथिल करून बाजार पेठ विकसित करण्यासाठी महापालिकेने परवानगी देण्याची मागणी होत आहे.
नाशिक : शहरातील सराफबाजार गेल्या आठवड्यात रविवारी (दि.४) गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेला. या भागातील भांडी व्यापारी व जंगम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे वारंवार येणाऱ्या पुरांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने व्यावसायिकांकडून पूररेषा शिथिल करून बाजार पेठ विकसित करण्यासाठी महापालिकेने परवानगी देण्याची मागणी होत आहे.
शहरातील जुनी व ऐतिहासिक वारसा असलेल्या या बाजारातील व्यावसायिकांमध्ये बाजारपेठ विकसित करण्याची क्षमता आहे. परंतु, केवळ पूररेषेच्या कारणामुळे पैसा असूनही सराफ व्यावसायिकांना त्यांच्या पेढ्या विकसित करता येत नाही. प्रत्येक वेळी येणाºया पुराच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी येणाºया प्रशासनाकडून पुराचे साचलेले पाणी गृहीत धरून पूररेषा निश्चित केली जाते. त्यामुळे सराफबाजारच पूर रेषेत आल्याने येथील व्यावसायिकांना येथील पेढ्या विकसित करता येत नाही. मात्र यासाठी महापालिकेचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून होत आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने १९३९ पासून २००८ पर्यंत दोनदाच सराफबाजारात पुराचे पाणी घुसले होते. मात्र २००८ नंतर आतापर्यंत तब्बल सात ते आठ वेळा सराफबाजारावर पाणी फिरले. शहरातील वीसहून अधिक नैसर्गिक नाले व उपनद्यांचे पाणी थेट नदी पात्रात जाण्याचा मार्गात कृत्रिम अडथळे निर्माण झाल्यामुळेच जोरदार पाऊस होताच सराफबाजार पाण्याखाली जातो. याला सर्वस्वी महापालिकेचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा येथील व्यावसायिकांचा आरोप आहे.
छोट्या कारागिरांवर उपासमारीची वेळ
सराफबाजारातील नागरे बंधू, मैंद सराफ, भगूरकर ज्वेलर्स, आंबेकर ज्वेलर्स, चिंतामणी ज्वेलर्स, सुहास अलंकार, आडगावकर सराफ, भावसार ज्वेलर्स याशिवाय अनेक लहान-मोठे कारागिरांचे मोठ्या प्रमाणात मशीनरीचे नुकसान झाले यात अनंता विसपुते, शेख पॉलिशवाले यांच्या मशीनरीचे मोटार खराब झाल्या, तर अनेक कारागिरांचे मशीनरी पूर्णपणे निकामी झाल्यात. काही छोट्या कारागिरावर उपासमारीची वेळ आलेली आहे. नाशिक सराफ असोसिएशन त्यांना मदतीचा हात देऊन त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत करीत आहेत.