कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा हेतू नाही, छगन भुजबळांचे स्पष्टीकरण
By श्याम बागुल | Published: August 20, 2023 04:44 PM2023-08-20T16:44:15+5:302023-08-20T16:45:35+5:30
मी जे काही बोललो त्यात कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नसल्याचेही भुजबळ यांनी सांगितले
नाशिक : कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. मात्र माध्यमांनी केवळ एक बाजू सांगितली तशी दुसरी बाजू पण सांगायला हवी असे सांगत कुठेही असलो तरी छत्रपती,फुले, शाहू आंबेडकरांची भूमिका कायम राहील असे स्पष्टीकरण राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कार्यक्रमात शनिवारी (दि.१९) केलेल्या सरस्वती, शारदा देवी तसेच ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींच्या नावाबाबत भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात उलट-सुलट प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात असतांना त्या संदर्भात भुजबळ यांनी रविवारी (दि.२०) प्रसारमाध्यमांसमोर आपले स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मविप्र समाज दिनाच्या कार्यक्रमात ज्यांनी शिक्षणासाठी काम केले,त्यांचे फोटो होते. आपल्याला शिक्षणाची कवाडे फुले दाम्पत्य, फातिमा शेख, राजर्षी शाहू महाराज,डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात यांनी उघडून कोट्यवधी लोकांना शिक्षित केले. हे आमचे देव आहे, त्यांची पूजा केली पाहिजे. मी हे आजच बोलतोय असा काही भाग नाही. तर वेळोवेळी त्याबद्दल मी बोललो आहे. मी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झालो म्हणून भूमिका बदलेल, असे काही नाही. आमची जी भूमिका आहे, ती बदलणार नाही. मी जे काही बोललो त्यात कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नसल्याचेही भुजबळ यांनी सांगितले