पाणीप्रश्नी ना बैठक, ना निरोप!

By admin | Published: February 17, 2016 11:49 PM2016-02-17T23:49:01+5:302016-02-17T23:49:24+5:30

भाजपाची पुडी : आमदार, गटनेत्याची चतुराई

No meeting with water, nor farewell! | पाणीप्रश्नी ना बैठक, ना निरोप!

पाणीप्रश्नी ना बैठक, ना निरोप!

Next

 नाशिक : पाणीकपात अथवा वाढीव पाणी आरक्षणाबाबत बुधवारी पालकमंत्री बैठक घेऊन निर्णय घेतील, असे ठामपणे मागील आठवड्यात महापौरांनी बोलविलेल्या बैठकीत सांगणारे भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि मंगळवारी झालेल्या महासभेत टीडीआरसंदर्भातील चर्चेत सदर बैठकीचे स्मरण करून देणारे भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी वेळ मारून नेण्यासाठी बैठकीची पुडी सोडल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी मंत्रालयात कोणतीही बैठक झाली नसल्याचे आणि सदर बैठकीबाबत महापालिका आयुक्तांसह महापौरांना कोणताही निरोप नसल्याचे समोर आले. भाजपा पदाधिकाऱ्यांच्या या टोलवाटोलवीचा सोशल मीडियावर मात्र खरपूस समाचार घेण्यात आला.
मागील आठवड्यात महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणीप्रश्नी सर्वपक्षीय गटनेते व भाजपा आमदारांची बैठक बोलविली होती. या बैठकीला भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे व अपूर्व हिरे उपस्थित होते. बैठकीत भाजपाला लक्ष्य केले जात असल्याचे लक्षात येताच आमदार बाळासाहेब सानप यांनी बुधवारी (दि.१७) मुंबईत पालकमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन वाढीव पाणी आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, सदर बैठकीविषयी महापालिका आयुक्त किंवा महापौरांना कोणताही निरोप आला नाही. बुधवारी सकाळपर्यंत अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी बैठकीच्या निरोपाची प्रतीक्षा केली परंतु अशी काही बैठक नसल्याचीच उत्तरे मंत्रालयातून मिळत गेल्याने बैठकीच्या निर्णयाकडे आस लावून बसलेल्या पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला. पाणीप्रश्नी सानप यांनी बैठकीचे गाजर पुढे करत वेळ मारून नेली असताना मंगळवारी झालेल्या महासभेत टीडीआर प्रश्नी चर्चेत भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनीही बुधवारी मुख्यमंत्री व सचिव यांची बैठक होणार असल्याचे आणि त्यात बांधकाम परवानग्यांबाबतचा निर्णय होणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. या बैठकीचाही काही मागमूस लागला नाही. त्यामुळे पाणीप्रश्नी आमदारांनी तर टीडीआर व बांधकाम परवानग्यांप्रकरणी भाजपा गटनेत्याने वेळ मारून नेल्याचे स्पष्ट झाले. भाजपाने सोडलेल्या या पुड्यांविषयी नंतर सोशल मीडियावर खमंग चर्चा रंगली. भाजपाला पाणी, टीडीआर याप्रश्नी नसलेले गांभीर्यही त्यानिमित्ताने समोर आले.

Web Title: No meeting with water, nor farewell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.