१५ वर्षांखालील मुलांसाठी ‘नो मोबाइल’! मालेगावच्या दाऊदी बोहरा समाजाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 08:54 IST2025-02-14T08:48:01+5:302025-02-14T08:54:16+5:30
अल्पवयीन मुले-मुली मोबाइलच्या आहारी गेले असून, त्यांच्यामध्ये शारीरिक व मानसिक विकार दिसून येत आहेत.

१५ वर्षांखालील मुलांसाठी ‘नो मोबाइल’! मालेगावच्या दाऊदी बोहरा समाजाचा निर्णय
मालेगाव (जि. नाशिक) : लहान मुलांना मोबाइलचे लागलेले वेड, त्याचे दुष्परिणाम यावर येथील दाऊदी बोहरा समाजाने उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे समाजातील १५ वर्षांच्या आतील मुला-मुलींना मोबाइल न देण्याचा घेतलेला निर्णय.
अल्पवयीन मुले-मुली मोबाइलच्या आहारी गेले असून, त्यांच्यामध्ये शारीरिक व मानसिक विकार दिसून येत आहेत. त्यामुळे स्वत:पासून सुरुवात करीत येथील दाऊदी बोहरा समाजाने पाऊल उचलले आहे. समाजाचे धर्मगुरु डॉ. सय्यद नाम मुफत्तल सैफुउद्दीन यांनी त्याबाबत पुढाकार घेतला.
यासाठी समाजाची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत लहान मुलांना मोबाइलमुळे होणारे डोळ्यांचे आजार, मुलांच्या मनावर होणारे विपरीत परिणाम, त्यांच्यातील शारीरिक कमजोरी आदी विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत डॉ. सय्यद यांनी मुलांना मोबाइल देऊ नये, अशा सूचना केल्या.
त्यावर सर्वांनी होकार दर्शवत पंधरा वर्षांच्या आतील मुला-मुलींना मोबाइलला हात लावू द्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला.