एकही नवीन संशयित कोरोना रुग्ण दाखल नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 09:41 PM2020-03-26T21:41:22+5:302020-03-26T23:04:32+5:30
मुंबई-पुण्याच्या जवळील शहर असल्याने सध्या कोरोनाबाबत अधिक सजग झालेल्या नाशिकमध्ये गुरुवारी (दि.२६) एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही. तर यापूर्वी दाखल दोन संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
नाशिक : मुंबई-पुण्याच्या जवळील शहर असल्याने सध्या कोरोनाबाबत अधिक सजग झालेल्या नाशिकमध्ये गुरुवारी (दि.२६) एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही. तर यापूर्वी दाखल दोन संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी (दि.२५) दोन नवे संशयित कोरोना रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्या तपासणीचा अहवाल गुरुवारी (दि.२६) प्राप्त झाला. त्यात कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर गुरुवारी कोणताही नवीन संशयित रुग्ण दाखल झालेला नाही. त्यामुळे बुधवारी दाखल झालेले दोन रुग्ण वगळता अन्य कोणीही या रुग्णालयात दाखल नाही. याशिवाय नाशिक महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि मालेगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातदेखील एकही रुग्ण दाखल झालेला नाही.
कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून नाशिकमध्ये सतर्कता बाळगली जात आहे. तथापि, विदेशात जाऊन आलेल्या नागरिकांची विशेष माहिती घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. सर्दी, खोकला आणि ताप यांसारखी कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणे दिसताच संबंधिताना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कक्षात दाखल करण्यात येते. आत्तापर्यंत ६० जणांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्टÑीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, परंतु सर्वच्या सर्व अहवाल आत्तापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यापुढेही काळजी घेण्यासाठी जिल्हा स्तरावर संचारबंदी लागू करतानाच जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. त्याचप्रमाणे सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच ४७ कोरोना चेकनाके सुरू केले आहेत.
कोरोनाग्रस्त देशातून आत्तापर्यंत ५१७ नागरिक नाशिक जिल्ह्यात आले असून, त्यात १४ दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले नागरिक १०६ आहेत, तर गुरुवारी ४११ नागरिकांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात आले. तथापि, सुदैवाची बाब म्हणजे अद्याप एकही पॉझिटिव्ह नागरिक आढळलेला नाही. अर्थात, प्रशासकीय यंत्रणा काळजी घेत असताना नागरिकांनीदेखील यापुढेही काळजी घेण्याची गरज असून संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
विदेशातून आलेल्या नागरिकांप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणेची मुंबई आणि पुण्याहून नाशिकला आलेल्यांवर करडी नजर आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण या दोन ठिकाणी आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यावरून येणाऱ्या नागरिकांचे नाव व पत्ते अगोदरच नोंदवून घेण्यात आले असून, त्याव्दारे त्यांच्यावरही नजर ठेवली जात आहे.