आमदारांच्या निधीतील कामांना नो एनओसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 02:17 AM2018-08-25T02:17:47+5:302018-08-25T02:18:23+5:30
शहरात आमदारांच्या निधीतील कामांना आता महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येणार नसून महापालिकेकडे भविष्यातील उत्तरदायित्वाचा विचार करता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला तशी सूचनाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली आहे.
नाशिक : शहरात आमदारांच्या निधीतील कामांना आता महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येणार नसून महापालिकेकडे भविष्यातील उत्तरदायित्वाचा विचार करता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला तशी सूचनाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली आहे.
शहराचे चार आमदार असून, त्यातील भाजपाच्या तीन आमदारांना शहरातच कामे करावी लागतात. राज्य शासनाच्या शहरी भागातील तीन आमदार पूर्णत: शहरी भागातील आहे. त्यामुळे त्यांना महापालिका हद्दीतच कामे करावे लागतात; परंतु शहरी भागात अशाप्रकारची विकासकामे केल्यानंतर त्याचे दायित्व महापालिकेकडे येते. एखादे समाजमंदिर किंवा व्यायामशाळेचे बांधकाम केल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्ती प्रसंगी कर्मचारी नियुक्त करण्यापर्यंतचे सर्वच काम महापालिकेला करावे लागत असते. मध्यंतरी राज्य शासनाने शहरी भागातील आमदारांना दहा कोटी रुपयांचा विशेष निधी दिल्यानंतर त्यातील पूर्व नाशिक मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पंचवटीत नाट्यगृह तर मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूररोडवर आकाशवाणी केंद्राजवळ तरण तलाव बांधण्याची तयारी केली होती; मात्र आयुक्तांनी अशाप्रकारची कामे विशेष निधीतून करण्यास नकार दिला.
पाच तरण तलाव संचलित करणारी ही देशातील पहिलीच महापालिका असल्याचा शेरा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडला होता. महाकवी कालिदास कलामंदिर चालविणे सोपे नसल्याने नव्या नाट्यगृहावर फुली मारली होती. त्यामुळे यातील काही नाराज आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तथापि, महापालिकेकडून अडचणी निर्माण होऊ नये यासाठी हा निधी शासनाच्या बांधकाम विभागाकडे वर्ग करून त्या माध्यमातून कामे करून घेण्याचा निर्णय आला. यातील तरण तलावाच्या कामाची निविदाही बांधकाम खात्याने काढली आहे.
तथापि, अशाप्रकारच्या निविदा काढल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बांधकाम विभागाला महापालिकेचा ना हरकत दाखला नसताना परस्पर निविदा काढण्याबद्दल विचारणा केली आहे. महापालिकेच्या हद्दीत कामे करताना बांधकाम विभागाने प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणीतही कामे करू नये असे बजावले असून, या कामांना आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे.