भारताला कोणीही रोखू शकत नाहीसरसंघचालक मोहन भागवत : ब्राह्मणगावी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:28 AM2017-12-06T00:28:00+5:302017-12-06T00:39:32+5:30
सटाणा/ब्राह्मणगाव : हिंदू धर्माचे आणि राष्ट्राचे रक्षण करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्तव्य आहे. चारित्र्यसंपन्न आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू धर्म असल्यामुळे भारताला कोणतीही शक्ती महासत्ता बनण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.
धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथे संघाच्या एका कार्यक्रमासाठी सरसंघचालक भागवत आज आले होते. परतीच्या मार्गावर बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील संघाचे कार्यकर्ते प्रवीण शेवाळे यांच्या कुटुंबियांच्या सदिच्छा भेटीसाठी आले होते. यावेळी संघाच्या शाखेत स्वयंसेवकांशी संवाद साधताना ते बोलत होते. राम ,कृष्ण आणि बुद्धांची ही पुण्यभूमी आहे. भारतमातेचा जयजयकार व्हावा यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. देशात वाईट प्रवृत्ती देखील आहेत. कोणी आपल्या देशात राहून देश विरु द्ध बोलण्याची भाषा करतो मात्र ती चार चौघात. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी संघ संस्काराचे धडे देत असल्याचे भागवत यांनी सांगितले. ब्राम्हणगावला येण्यापूर्वी ताहाराबाद येथील संघाचे कार्यकर्ते आबा बच्छाव यांच्या निवासस्थानी भागवत यांनी भेट दिली. त्यानंतर ब्राम्हणगावला आगमन झाले. सुरुवातीला संघाचे कार्यकर्ते जोशी यांच्या निवासस्थानी संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची पाऊणतास बैठक चालली. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भागवत यांनी सव्वा आठ वाजता शेवाळे कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली .त्यानंतर कुटुंबीयांसोबत भोजन घेतले. यावेळी जिल्हा संघचालक गोविंद अहेर, कैलास साळुंखे, आबा बच्छाव, सोनवणे, धनंजय पंडित ,मनोज केल्हे, आबा कापडणीस, किरण अहिरे, सरपंच सरला अहिरे, मविप्रचे उपसभापती राघो अहिरे, डॉ. विलास बच्छाव, अण्णा सावंत, जगदीश मुंडावरे आदी उपस्थित होते. दरम्यान भागवत यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संघाचे टीमवर्क असून समाजाला चांगली दिशा देण्याचे काम संघाच्या माध्यमातून केले जात आहे. अशा चारित्र्यसंपन्न नागरिकाने देशहित जोपासल्यास भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.