संपामुळे शासकीय कार्यालये पडले ओस; काम होत नसल्याने लोक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 02:55 PM2023-03-17T14:55:36+5:302023-03-17T14:55:51+5:30
कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे कार्यालये ओस पडली असून, कामे ठप्प झाली आहेत.
संजय देवरे
देवळा (जि. नाशिक) : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी संपामुळे शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. देवळा तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी ह्या संपात सहभागी झाल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी गजबजलेली शासकीय कार्यालये ओस पडली असून, तेथील कामकाज ठप्प झाले आहे.
शिवस्मारकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून देवळा तालुक्यात मंगळवारी संपाला सुरुवात झाली. संपामुळे मंगळवारपासून तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख, ग्रामीण भागातील ग्रामपंचायती आदी कार्यालयांतील शासकीय, निमशासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे कार्यालये ओस पडली असून, कामे ठप्प झाली आहेत. वरिष्ठ अधिकारी मात्र कार्यालयात उपस्थित राहात आहेत.